क्रोएशियातील स्पर्धेत ट्रप नेमबाजीत चौथे स्थान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भौनीश मेंदिरत्ताने नेमबाजीमध्ये भारतासाठी 2024 पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला कोटा मिळविला. क्रोएशियातील ओसिएक येथे आयएसएसएफ शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पुरुष ट्रप नेमबाजीत चौथे स्थान मिळवित त्याने यश मिळवले.
पदकाच्या राऊंडमध्ये 35 शॉट्सच्या पहिल्या फेरीत 15 पैकी 13 शॉट्स नोंदवत तोच सर्वप्रथम बाहेर पडला. या स्पर्धेत पुरुष व महिलांच्या ट्रप नेमबाजीत प्रत्येकी चार ऑलिम्पिक कोटा दिले जाणार आहेत. जागतिक क्रमवारीत 144 व्या स्थानावर असणाऱया 23 वर्षीय भौनीशने मानांकनाच्या दुसऱया फेरीत पहिले स्थान मिळवित भारताचा ऑलिम्पिक कोटा निश्चित केला. या फेरीत त्याने 25 पैकी 24 वेळा अचूक वेध घेतला. या युवा खेळाडूने यापूर्वी वरिष्ठ स्तरावर एकमेव पदक मिळविले असून याच वर्षी झालेल्या चाँगवॉन वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत त्याने सांघिक रौप्य मिळविले आहे.
तत्पूर्वी पात्रतेच्या शेवटच्या फेरीत त्याने 25 पैकी 25 गुण घेत एकूण 121 गुण घेतले. दुसऱया स्थानावर चौघांनी समान गुण नोंदवल्याने त्यांच्यात शूटऑफ घेण्यात आले आणि त्यात भौनीशला चौथे स्थान मिळाले. दोन रँकिंग राऊंडसाठी 154 मधून आठ नेमबाज पात्र ठरले. सातव्या व आठव्या क्रमांकासाठी 11 नेमबाजांत शूटऑफ घेण्यात आले. भौनीशसह अमेरिकेचा जागतिक तिसरा मानांकित डेरिक मेइन, ब्रिटनचा ऍरोन हेडिंग, कतारचा आरएच अल अल्थबा यांनी दुसऱया रँकिंग राऊंडमध्ये भाग घेतला. डेरिक मेइनने दुसरे, अल अल्थबा व हेडिंग यांनी पात्रतेमध्ये अनुक्रमे सहावे व आठवे स्थान मिळविले. हेडिंग 15 पैकी 11 गुण नोंदवत सर्वप्रथम बाहेर पडला. डेरिकने 15 पैकी 15 शॉट्स नोंदवले तर भौनीशने 14 शॉट्स नोंदवत दुसरे स्थान घेतले. याचवेळी अल अल्थबाने 12 गुण नोंदवले.
ऑलिम्पिक कोटय़ावर लक्ष ठेवत भौनीशने शानदार प्रदर्शन करीत 10 वेळा अचूक वेध घेत या फेरीत अव्वल स्थान मिळविले. अमेरिकेच्या डेरिकने अंतिम फेरीत 33 गुण नोंदवत सुवर्ण, ब्रिटनच्या नाथन हॅलेसने 31 गुणांसह रौप्य व तैपेईच्या कुन पि यांगने कांस्य मिळविले. या तीन पदकविजेत्यांनीही आपापल्या देशासाठी ऑलिम्पिक कोटा मिळविला. यात सहभागी झालेल्या अन्य भारतीय खेळाडूंत पृथ्वीराज तोंदायमनने 119 गुण घेत 22 वे तर विवान कपूरने 107 गुण नोंदवत 119 वे स्थान मिळविले.
भारताच्या महिला नेमबाजांकडून मात्र निराशाजनक प्रदर्शन झाले. महिलांच्या ट्रप नेमबाजीत भारताच्या नीतूने 111 गुण घेत 29 वे, श्रेयसी सिंगने 110 गुणांसह 35 वे, मनीषा किरने 102 गुणांसह 61 वे स्थान मिळविले. या विभागात फ्रान्सने सुवर्णपदक मिळविले. त्यांच्यासह स्पेन, स्लोव्हाकिया, ऑस्ट्रेलिया यांनी ऑलिम्पिक कोटा मिळविला. भारत या स्पर्धेच्या पदकतक्त्यात चौथ्या स्थानावर असून त्यांनी एक सुवर्णपदक मिळविले आहे.