प्रतिनिधी /मडगाव
‘ईद-ए-मिलाद’ निमित्त काल रविवारी मुस्लिम बांधवांनी मडगाव शहरात जुलूस काढला. या जुलूसला मुस्लिम बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. दुपारी 3 वाजल्यापासून मालभाट येथील मशिद जवळून या जुलूसला प्रारंभ झाला. जुलूसच्या दरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी देखील उपस्थित होते.
इस्लाम धर्मात ईद मिलाद उन-नबी या उत्सवाचं अनन्य साधारण महत्व आहे. ईद-ए-मिलाद किंवा मालविद या नावानं देखील हा सण ओळखला जातो. काल या सणानिमित्त मडगाव परिसरातील विविध मशिदशी संबंधीत असलेल्या मुस्लिम बांधवांनी जुलूस काढला. त्यात हाऊसिंग बोर्ड दवर्ली, रूमडामळ, शिरवडे, मालभाट, मोती डोंगर, पाजीफोंड, फातोर्डा इत्यादी भागातील मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते.
हा जुलूस मालभाट येथील मशिदकडून हॉस्पिसियो मार्गे रवींद्र भवन पर्यंत गेला व नंतर तेथून कोलवा सर्कल पर्यंत जुलूस निघाला व नंतर त्याची एसजीपीडीए मैदानावर सांगता झाली.