सरकारी पक्षातर्फे ऍड. रियाज जमादार यांनी काम पाहिले
सांगली प्रतिनिधी
मिरजेतून अल्पवयीन मुलीस कोल्हापूर जिह्यातील कागल येथे रिक्षातून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी शिवाजी बसवण्णा इंगवले (वय 23, हनुमान मंदिरानजीक, दुर्गानगर, एमआयडीसी, मिरज) यास दोषी ठरवून विशेष जिल्हा अति. सत्र न्यायाधिश (पोक्सो कोर्ट) डी. एस. हातरोटे यांनी त्यास आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच 15 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड रियाज जमादार यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, आरोपी शिवाजी इंगवले याचा रिक्षा व्यवसाय आहे. त्याची पिडीत मुलीशी ओळख होती. पिडीत मुलगी घराबाहेर पडल्याचे दिसल्यावर इंगवलेने मित्राच्या सहाय्याने तिला जबरदस्तीने रिक्षात घातले. तसेच आरडाओरड केल्यास तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक तीन एप्रिल 2017 रोजी घडली. त्यानंतर मुलीला रिक्षातून जोतीबाला नेण्यात आले तेथून तिला कागल येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पिडीत मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच घरच्यांनी शोधाशोध सुरु केली होती. दुसऱया दिवशी इंगवलेचा मित्र त्याची रिक्षा घेऊन मिरजेत परत येत असताना पिडीत मुलीचा भाऊ व तिच्या मित्रांना दिसला. त्यांनी इंगवलेच्या मित्रास पकडले व आरोपी इंगवले कोठे आहे असे विचारले. घाबरुन त्याने कागल येथील पत्ता सांगितला. त्याला घेवून सर्वजण घटनास्थळी गेले असता इंगवलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास पकडले आणि कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. त्यापैकी पिडीता, तिचे वडील, तसेच वैद्यकीय अधिकाऱयांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सदर गुह्याचा तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक भवड आणि पोलीस उपनिरिक्षक के. एम. गायकवाड यांनी केला. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन आरोपी शिवाजी इंगवले यास दोषी ठरवून त्यास आठ वर्षे सक्तमजुरी तसेच पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यापैकी बारा हजार रुपये पिडीत मुलीस देण्याचा आदेश न्यायमूर्तींनी दिला. सरकारपक्षातर्फे ऍड रियाज एस.जमादार यांनी काम पाहिले.