-उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
-इ. 5 ते 7 वीमधील इस्त्रोसाठी 27 तर नासा सफरीसाठी 9 विद्यार्थ्यांची निवड होणार
प्रतिनिधी, रत्नागिरी
Ratnagiri News: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या इ. 5 ते इ. 7 वीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागावी, यासाठी भारतातील ‘इस्त्रो’ आणि अमेरिकेतील ‘नासा’ या दोन वैज्ञानिक संस्थांची सफर घडवण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘इस्त्रो’ या सफरीसाठी 27 तर ‘नासा’ या सफरीसाठी 9 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा घडवून हा निर्णय घेण्यात आला आहे. विज्ञान तसेच संशोधन अभ्यासाची आवड असणाऱ्या निवडक विद्यार्थी ‘इस्त्रो’ व ‘नासा’ या संस्थांना भेटी घडवून आणण्याचा हा महत्वपूर्ण उपक्रम जिल्हास्तरावर प्रथमच हाती घेण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ निर्मितीत पाया रोवणे हा उद्देश आहे. त्यातून अंतराळ संशोधनाबाबत विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना त्यातून ओळख निर्माण होणार आहे. या दोन्ही वैज्ञानिक संस्थांच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करणेही सोयीचे जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीचा विकास होईलच पण त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अभूतपूर्व अनुभव घेता येणार आहे.
अधिक वाचण्यासाठी- व्यायामपटुंची पिढी घडवणारा बिभिषण….
या दोन्ही संस्थांना भेटी घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील केंद्रस्तर, बीटस्तर, तालुका व जिल्हास्तर अशी निवड केली जाणार आहे. त्यासाठी विज्ञानविषयक 50 प्रश्न व 100 गुणाची बहुपर्यायी वस्तूनिष्ट चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. निबंध स्पर्धाही या अनुषंगाने घेतली जाणार आहे. ही निवड केंद्रस्तरावरून प्रत्येक केंद्रातून 10 विद्यार्थी निवडले जातील. नंतर प्रत्येक बीटस्तरावरून त्यातील 10 विद्यार्थी निवडून ते तालुकास्तरावर पाठवले जातील. त्यानंतर जिल्हास्तरासाठी निवडल्या जाणाऱ्या प्रत्येकी बीटस्तरावरील 10 विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखती व सादरीकरणक घेतले जाईल. तसेच 9 तालुक्यातून 27 विद्याथी निवडले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून 3 विद्यार्थी निवडताना त्यामध्ये 1 विद्यार्थिनी निवड बंधनकारक करण्यात आली आहे. या विद्यार्थी निवडीसाठी 30 नोव्हेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान संभाव्य परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना नासा व इस्त्रो भेटीत दाखवल्या जाणाऱ्या गोष्टीः
• नासा भेटीत स्पेस सेंटर ह्युमन मुन 2, नासामिशन माहिती, केनेडे स्पेस सेंटर, शटल प्रेक्षेपण यांची माहिती मिळणार आहे.
• स्मिथ रोनियन म्युझियमध्ये 27 संग्रहालये, 14 शिक्षण आणि संशोधन केंद्रे, शेकडो शैक्षणिक माॅडेल्स पहायला मिळणार.
• विद्यार्थ्यांना आयमॅक्स सेंटरमध्ये थ्रीडी इफेक्ट बघण्याचा आनंद लुटता येणार.
• इस्त्रो भेटीत राॅकेटचे होणारे प्रक्षेपण, प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ काम करत असतानाच्या गोष्टी अनुभवता येणार आहेत.