शोपियांमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला : उत्तरप्रदेशच्या 2 कामगारांचा मृत्यू
वृत्तसंस्था /शोपियां
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय कामगारांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. शोपियांच्या हरमेनमध्ये दहशतवाद्यांनी कामगारांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले दोन्ही कामगार हे उत्तरप्रदेशच्या कनौज येथील रहिवासी होते.
दहशतवाद्यांनी 5 जणांच्या दिशेने ग्रेनेड फेकला होता. पोलिसांनी याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या एका हायब्रिड दहशतवाद्याला अटक केली असून त्याचे नाव इमरान बशीर गनी आहे. हे कामगार सोमवारी रात्री झोपलेले असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा हे मंगळवारी शोपियांचा दौरा करणार होते, त्यापूर्वीच दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला.
मागील 3 दिवसांमध्ये शोपियांत टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शोपियांमध्ये काश्मिरी पंडित पूरन कृष्ण भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून हत्या केली होती. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. लवकरच मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.
दुसरीकडे पुलवामा येथे विशेष तपास पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात सापडलेल्या 30 किलोग्रॅम आयईडीच्या संबंधी ही कारवाई केली जातेय. कुपवाडामध्ये सोमवारी मोहम्मद शफी नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून काही शस्त्रास्त्रs हस्तगत झाली आहेत. दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रास्त्रs पोहोचविण्याचे काम तो करत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मानस यांनी दिली आहे.