ऑनलाईन टीम/तरुण भारत
Liz Truss Resigns : ब्रिटनच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ सहा आठवड्यांमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वाढती महागाई आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता; या कारणांमुळे ट्रस यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ब्रिटनमध्ये राजकीय पेच निर्माण झालेला आहे.
लिझ ट्रस सरकारने मांडलेल्या मिनी बजेटनंतर देशभरात कर रचनेवरुन गोंधळ झाला होता. या बजेटवरून ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनीही त्याला विरोध केला होता. त्याची परिणीती आता पंतप्रधानांच्या राजीनाम्यात झाली आहे.
राजीनामा देताना लिझ ट्रस म्हणाल्या, मला ज्या गोष्टीसाठी बहुमत मिळालं ती गोष्ट मी पूर्ण करु शकले नाही. आपला राजीनामा द्यायच्या आधी एक दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, मी लढेन, पळ काढणारी नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर राजीनामा द्यायची वेळ आली.