72 जणांचा मृत्यू ः अनेक जण जखमी
वृत्तसंस्था / मनीला
फिलिपाईन्सच्या एका प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन होत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 14 जण बेपत्ता असून 33 जण जखमी झाले आहेत. अतिवृष्टीमुळे या प्रांतात पूरसंकट निर्माण झाल्याने लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत.
देशातील 5 मुस्लीम स्वायत्त प्रांतांचे गृहमंत्री नगुइब सिनारिम्बो यांच्यानुसार मॅगुइन्डानाओ प्रांतातील 3 शहरे या आपत्तीमुळे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने बचाव अन् मदतकार्य हाती घेण्यात आल्याचे सिनारिम्बो यांनी सांगितले आहेश.
नालगेई चक्रीवादळामुळे ही अतिवृष्टी होत असल्याचे फिलिपाईन्सच्या हवामान विभागाने म्हटले आहे. फिलिपाईन्समध्ये दरवर्षी 20 अधिक तीव्रतेची चक्रीवादळे धडकत असतात. मागील वर्षी डिसेंबरमध्ये देशात राय चक्रीवादळ धडकले होते आणि यात सुमारे 208 जणांचा मृत्यू झाला होता. तर 4 लाख लोक प्रभावित झाले होते. चालू वर्षातील एप्रिल महिन्यात मेगी चक्रीवादळाने मोठे नुकसान घडवून आणले होते. या चक्रीवादळात 42 जणांचा मृत्यू झाला होता आणि 17 हजार लोक बेघर झाले हेते.