प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेला ‘गोवा इंटग्रेटेड सिटी मॅनेजमेंट सिस्टिम’ हा प्रकल्प अंतिम टप्यात असून त्याचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या त्याची तपासणी करण्याचे काम सुरू असून येत्या डिसेंबरअखेर उर्वरीत 5 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प 100 टक्के क्षमतेने कार्यरत करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पात पणजी शहर व सभोवतालच्या परिसरात मोफत वाय-फाय सेवा अर्थात इंटरनेट मिळणार असून त्यासाठी सुमारे 500 वाय-फाय पॉईट बसवण्यात आले आहे. एकूण रु. 181 कोटीचा या प्रकल्पाचे काय इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीतर्फे लार्सन दुब्रो कंपनीच्या वतीने चालू आहे.
इमॅजिन पणजीच्या प्रकल्पाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 22 पर्यंतची मुदत लार्सन-टुब्रोला देण्यात आली असून त्यात सीसीटिव्ह, वायफाय, स्मार्ट पार्कींग, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन, पोलीस तपासणी, वाहतूक तपासणी इत्यादी विविध कामांचे समावेश आहे. आल्तिनो पणजी येथील आयटी हब या इमारतीत वरील सर्व कामांवर देखरेख नजर ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून अत्याधुनिक ऑनलाईन पद्धतीने वरील कामांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राजधानी पणजीत विविध ठिकाणी देखरेख करण्यासाठी 382 सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत तर सिग्नल यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी 88 सीसीटिव्ही कॅमेरांची सोय करण्यात आली आहे. सर्व कॅमेरा कार्यान्वित असून त्यांची तपासणी आल्तिनो येथील नियंत्रण कक्षातून सातत्याने करण्यात येते. काही तांत्रिक व किरकोळ कामे शिल्लक असल्याने ती झाल्यानंतरच येत्या दोन महिन्यात सदर प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाणार आहे.
पणजीत रहाणाऱया आणि पणजीत येणाऱया-जाणाऱया सर्वांना मोफत वाय-फाय सुविधा मिळणार आहे. त्याचा लाभ पर्यटक, प्रवासी अशा सर्वांना आणि स्थानिकांना होणार असून चार चाकी वाहनांसाठी स्मार्ट पार्कींगची सोय करण्यात मिळणार आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातून पार्कींगची नेमकी जागा कुठे आहे ते कळणार असून वाहनचालकाला पार्कींगसाठी फिरण्याची गरज भासणार नाही.
पर्वरी, ओल्ड-गोवा, ताळगांव, मेरशी अशा राजधानी पणजीत प्रवेश करणाऱया विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरांची सोय करण्यात आली असून सिग्नल जंक्शन असलेल्या 10 ठिकाणी वाहतूक नियंमांचे उल्लंघन करणाऱया वाहनांना शोधण्यासाठी वेगळे कॅमेरा बसवण्यात आले आहेत. सिग्नल तोडणाऱया वाहनांवर ते नजर ठेवणार असून सध्या पोलिसांना विविध गुन्हय़ांच्या तपासासाठी या सीसीटिव्ही कॅमेरातील फुटेजचा उपयोग होत असल्याचे समोर आले आहे.