अजेंडा वाचत सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत कमिटीचा काढता पाय
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा बोडगेश्वर संस्थानने रविवार दि. 30 रोजी बोलावण्यात आलेली आमसभा सुरु होऊन अवघ्या पाच मिनिटात आटोपती घेण्यात आली. समितीचे सचिव ऍड. वामन पंडित यांनी सभेसमोरील अजेंडा वाचत हे विषय मंजूर झाल्याचे तसेच ही सभा संपली असे जाहीर करुन बैठकीतून सचिवाबरोबर अध्यक्ष व इतर पदाधिकाऱयांनी काढता पाय घेतला. सूचक, अनुमोदक हेही यावेळी घेण्यात आले नाही.
महाजन ऍड. महेश राणे आणि विनोद फडके यांनी बैठक घेत असल्याचे सचिव ऍड. पंडित यांनी जाहीर करताच ही सभा बेकायदेशीर असून ती रद्द करावी, अशी मागणी करत व्यासपीठावर धाव घेतली. ऍड. सुभाष नार्वेकर यांनीही या बैठकीस आक्षेप घेतला. काही महाजनांनी व्यासपीठाकडे धाव घेतल्यावर सचिव ऍड. पंडित यांनी अजेंडा व इतर विषय मंजूर झाल्याचे सांगत राहीले. त्यावर काही महाजन संतप्त झाले. त्यांनी व्यासपीठावरील टेबलावर जोरजोराने हात आपटू लागले असता तेथे बराच गदारोळ व वातावरण तंग झाले. याचा फायदा घेत देवस्थान समितीच्या पदाधिकाऱयांनी व्यासपीठावरुन काढता पाय घेत तेथून पळ काढला. त्यामुळे उपस्थित महाजनांमध्ये एकच नाराजीचा सूर पसरला.
गेल्या दोन बैठकांमध्ये देव बोडगेश्वर संस्थानने बोलावलेल्या महाजनांच्या सभेत जमा खर्चावरुन वाद निर्माण झाला होता. पांडुरंग कोरगावकर यांच्या निधनानंतर काहीनी त्यांच्या बनावट सहीचा वापर करुन हिशोब सादर केला. त्यावर सचिवाची सही नसल्याने महाजनांनी सभेत प्रश्नांचा भडीमार केला होता मात्र प्रकरण हातघाईवर जाणार म्हणून त्यावेळी अध्यक्ष भाईडकर यांनी सभा तहकूब केली होती.
कोविड काळात जमा खर्चाचा अहवाल न केल्याने सभा पुन्हा बोलावण्यात आली होती. त्यावेळी महाजनांनी देवस्थानच्या कारभारावर व आर्थिक व्यवहारात अनेक गैरप्रकार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. अंदाजपत्रकाला मान्यता नसताना 3 वर्षांचा सादर केलेला जमाखर्च बेकायदा असल्याचे महाजनांनी म्हटले होते.
रविवारी सभेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बार्देशचे मामलेदार दशरथ गावस उपस्थित होते. शिवाय म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईकही सर्वत्र लक्ष ठेवून होते. त्यांनी पोलिसांसह अतिरिक्त फौजफाटाही बैठकीसाठी तैनात केला होता. महाजनही मोठय़ा संख्येने उपस्थित होते मात्र बैठक अवघ्या पाच मिनिटात संपविल्याने महाजन नाराज झाले होते.