मागील 24 वर्षांमध्ये 200 कोटी लोकांची भर : संयुक्त राष्ट्रसंघाचा अनुमान ठरला खरा
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
जगात 800 कोटीव्या मुलाने जन्म घेतला आहे. लोकसंख्येला रियल टाइम ट्रक करणारी वेबसाइट वर्ल्डोमीटर डॉट इन्फोनुसार मंगळवारी दुपारी सुमारे 1 वाजून 30 मिनिटांनी या मुलाने जन्म घेतला आहे. याच्या जन्मासोबतच जगाची लोकसंख्या 8 अब्ज झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विषयक अहवालात 15 नोव्हेंबर 2022 रोजी जागतिक लोकसंख्या 800 कोटी होणार असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आलेला अनुमान खरा ठरला आहे.
जगाच्या लोकसंख्येत मागील 24 वर्षांमध्ये 200 कोटींची भर पडली आहे. 1998 मध्ये जागतिक लोकसंख्या 600 कोटी इतकी होती. 2010 मध्ये हा आकडा वाढून 700 कोटी झाला होता. तर पुढील 12 वर्षांमध्ये यात आणखी 100 कोटीची भर पडली आहे. जागतिक लोकसंख्येसंबंधी 2 हजारपेक्षा अधिक वर्षांच्या कालावधीतील नोंद आहे.
ख्रिस्तांच्या जन्मावेळी जागतिक लोकसंख्या 20 कोटींच्या आसपास होती. हा आकडा 100 कोटीपर्यंत पोहोचण्यास सुमारे 1800 वर्षे लागली होती. म्हणजेच 100 कोटीहून 200 कोटीपर्यंत पोहोचण्यास जगाला 130 वर्षांचा कालावधी लागला आहे.
आरोग्य सेवेत सुधारणा अन् लोकसंख्या वाढ
औद्योगिक क्रांतीसह आरोग्य सेवांमध्ये वेगाने सुधारणा झाली. याचाच परिणाम म्हणून जन्माला येणाऱया मुलांमधील मृत्यूदर अन् प्रसूतीवेळी मृत्युमुखी पडणाऱया महिलांचे प्रमाण कमी होत गेले. तसेच लोकसंख्येत वाढ होत गेली. पुढील 30 वर्षांमध्ये लोकसंख्या 200 कोटीवरून 300 कोटी झाली. तर केवळ 14 वर्षांमध्ये लोकसंख्या 300 कोटीवरून 400 कोटीवर पोहोचली होती.
2030 पर्यंत 850 कोटी
सध्याचा कल पाहिल्यास 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढून 850 कोटीपर्यंत पोहोचू शकते. 1950 नंतर पहिल्यांदाच 2020 मध्ये लोकसंख्या वाढीच्या दरात एक टक्क्यांची घसरण नोंदली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
50 टक्के लोकसंख्या 8 देशांमध्ये
2050 पर्यंत लोकसंख्येतील निम्म्याहून अधिक हिस्सा केवळ 8 देशांमध्ये असणार आहे. यात भारतासह पाकिस्तान, फिलिपाईन्स, इजिप्त, कांगो, नायजेरिया, टांझानिया आणि इथियोपिया सामील असेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद आहे. तर 2022-50 दरम्यान 61 देशांची लोकसंख्या घटणार असून यातील बहुतांश देश हे युरोपीय असतील, असा अनुमान संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. सध्या 46 देशांची लोकसंख्या सर्वाधिक वेगाने वाढत असून यातील 32 देश हे सब सहारा आफ्रिकेचे आहेत.
भारतात सर्वाधिक लोकसंख्या
जागतिक लोकसंख्या दिनी संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केलेल्या अनुमानानुसार 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होणार आहे. याचबरोबर भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरणार आहे. सध्या चीनची लोकसंख्या 142 कोटी आहे. तर भारताची लोकसंख्या 141 कोटी इतकी आहे. 2023 मध्ये भारताची लोकसंख्या वाढून 142 कोटी होणार आहे. तर 2050 पर्यंत हा आकडा वाढून 168 कोटी होण्याची शक्यता आहे. शतकाच्या मध्यापर्यंत चीनची लोकसंख्या कमी होत 131 कोटी होण्याची शक्यता आहे.
वृद्धांची संख्या वाढणार सध्या जगात 50.3 टक्के पुरुष तर 49.7 टक्के महिला आहेत. परंतु 2050 पर्यंत दोघांची संख्या समान होणार आहे. याचबरोबर सध्या जागतिक लोकसंख्येत 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांचे प्रमाण 10 टक्के आहे. 2022-30 दरम्यान हे प्रमाण वाढून 12 टक्के तर 2050 पर्यंत 16 टक्के होईल. यादरम्यान युरोप आणि उत्तर अमेरिकेतील प्रत्येक 4 पैकी एक व्यक्ती हा 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असणार आहे.