वृत्तसंस्था /देगू (द. कोरिया)
आशियाई एअरगन चॅम्पियनशीप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी आतापर्यंत 34 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 22 सुवर्ण, 8 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. ही स्पर्धा वरिष्ट, कनिष्ट आणि युवा अशा तीन विविध गटात खेळविली जात आहे. या स्पर्धेत बुधवारी भारताने आणखी 4 सुवर्ण व 2 रौप्यपदकांची कमाई केली.
स्पर्धेच्या दुसऱया दिवशी पिस्तुल नेमबाजीत भारतीय नेमबाजांनी 4 सुवर्णपदके मिळविली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली भारताची नेमबाज मनु भाकरने कनिष्ट महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत इशा सिंगचा 17-15 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. वरिष्ट महिलांच्या विभागात 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत भारताच्या 18 वषीय रिदम सांगवानने पलकचा 16-8 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. पुरुषांच्या वरिष्ट आणि कनिष्ठांचा 10 मी. एअरपिस्तुल सांघिक नेमबाजीत भारताने आणखी 2 सुवर्णपदकांची कमाई केली. 10 मी. एअरपिस्तुल वरिष्ट सांघिक प्रकारातील अंतिम लढतीत भारताच्या शिवा नरवाल, नवीन आणि विजयवीर सिद्धू यांनी दक्षिण कोरिया संघाचा 16-14 असा पराभव केला. 2018 साली विश्व चॅम्पियनशीप मिळविणाऱया कोरियन संघामध्ये देहून, देमंग आणि मून यांचा समावेश होता.
पुरुषांच्या 10 मी. एअरपिस्तुल सांघिक कनिष्ठांचा विभागातील अंतिम लढतीत भारताच्या सागर डांगी, सम्राट राणा आणि वरुण तोमर यांनी उझ्बेकच्या केमालोव्ह, नुरीडिनोव्ह आणि ओबिदजोनोव्ह यांचा 16-2 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सदर स्पर्धा 18 नोव्हेंबरला संपणार आहे.