मूळचे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण गावचे ः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
डब्लिन / वृत्तसंस्था
भारतवंशी लिओ वराडकर पुन्हा युरोपियन देश आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. दुसऱयांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत सरकार आयर्लंडबरोबरचे ऐतिहासिक संबंध, सामायिक घटनात्मक मूल्ये आणि बहुआयामी सहकार्याला खूप महत्त्व देतो. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करूया, असा संदेश मोदी यांनी ट्विट केला आहे.
43 वषीय लिओ वराडकर हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. तसेच ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान देखील आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. 2017 मध्ये वयाच्या 38 व्या वषी ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचा कार्यकाळ 2020 पर्यंत होता. 2020 मध्ये आयर्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर मायकेल मार्टिन यांचा पक्ष ‘फिएन्ना फेल’ आणि वराडकर यांचा पक्ष ‘फाईन गेल’ यांच्यात ऐतिहासिक करार झाला होता. त्यानंतर मार्टिन देशाचे पंतप्रधान झाले. या करारानुसार पाच वर्षांच्या कार्यकाळातील पहिल्या अडीच वर्षांसाठी मार्टिन देशाचे पंतप्रधान आणि वराडकर उपपंतप्रधान झाले होते. आता अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर लिओ वराडकर हे पंतप्रधान आणि मार्टिन हे देशाचे उपपंतप्रधान झाल्याने आता देशाची धुरा लिओ वराडकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
लिओ वराडकर यांचा जन्म 18 जानेवारी 1979 रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे झाला. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. 2007 मध्ये डब्लिन वेस्टमधून ‘फाईन गेल’च्या तिकिटावर निवडणूक जिंकत ते नगरसेवक झाले. त्यावेळी ते अवघ्या 28 वर्षांचे होते.
2015 मध्ये समलिंगी असल्याची घोषणा
आयर्लंडमध्ये 1993 पर्यंत समलैंगिकता हा गुन्हा मानला जात होता. 2013 मध्ये, आयर्लंडने सार्वमत घेतल्यानंतर मे 2015 मध्ये समलिंगी विवाहाला मान्यता दिली. हा निर्णय होण्यापूर्वी काही महिने म्हणजे जानेवारी 2015 मध्ये वराडकर उघडपणे समोर आले आणि त्यांनी आपण समलिंगी असल्याचे जाहीर केले. त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते.
आई नर्स, वडील डॉक्टर
लिओ वराडकर यांची आई मरियम ही आयर्लंडशी संबंधित होती. तर त्यांचे वडील अशोक वराडकर हे मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिह्यातील वराड गावचे आहेत. ते व्यवसायाने डॉक्टर होते. मुंबईत राहत असतानाच वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने ते आयर्लंडला गेले अन् तिथेच स्थायिक झाले. 1960 च्या दशकात त्यांनी इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत काम केले. याचदरम्यान त्यांची मरियम यांच्याशी ओळख झाली होती. लिओ यांची आई त्यावेळी नर्स म्हणून काम करत होती.