मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सज्जड दम : गुरुवारपासून मोपा विमानतळावर उड्डाणे
प्रतिनिधी / पणजी
मोपा विमानतळावरील गोवा टॅक्सी ऍप सेवेबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कणखर भूमिका घेतली आहे. मोपा विमानतळावरील टॅक्सी सेवेच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणणाऱयांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
पेडणेतील काही टॅक्सी व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, गोवा टॅक्सी ऍपच्या माध्यमातून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी सेवा चालणार आहे. टॅक्सीच्या मुद्यावरून विनाकारण राजकारण करणाऱयांना स्थानिक व्यावसायिकांनी बळी पडू नये. गोव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल.
यावेळी पेडणे तालुक्यातील पंचायत आणि पेडणे नगरपालिकेच्या सदस्यांना ऍपद्वारे मिळणाऱया फायद्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत खात्री दिली.
ऍपची कार्यप्रणाली जीईएलद्वारे
हे ऍप जीईएलद्वारे व्यवस्थापित काउंटरद्वारे रांग व इतर प्रणालीसह कार्य पार पाडले जाईल, त्यामुळे राज्यातील टॅक्सी चालकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. पेडणेतील जनतेला व व्यावसायिकांना मोपातील प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेण्याबरोबरच टॅक्सी ऍपबाबतही प्रथम प्राधान्य दिले जाईल. या विषयावर तिन्ही टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱयांशी सविस्तर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
मोपा विमानतळावरील टॅक्सी सेवेबाबत पेडण्यातील व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल. जर त्यांना (टॅक्सी ऑपरेटर) त्यांची टॅक्सी मोपावर चालवायची असेल तर त्यांना ऍपमध्ये सामील व्हावे लागेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गुरुवारपासून विमान उड्डाणे
मुख्यमंत्र्यांनी येत्या गुरुवारी 5 जानेवारीपासून मोपा विमानतळावरील उड्डाणे सुरू होतील, अशी माहिती दिली. स्वतंत्र काउंटर उपलब्ध करणे बंधनकारक
बैठकीच्या स्थळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुदीप ताम्हणकर म्हणाले की, मोपा विमानतळ, दाबोळी विमानतळ आणि मडगाव रेल्वे स्थानकावर पिवळय़ा आणि काळय़ा टॅक्सी काउंटर उपलब्ध करून देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. जर सरकार स्थानिक टॅक्सी चालकांसाठी टॅक्सी स्टँड उपलब्ध करून देत नसेल, तर त्याच्या निषेधार्थ टॅक्सीचालक व्यवसायात उतरणार नाहीत.
पेडणेतील लोकांनी विचार करण्याची गरज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे मत
गोवा टॅक्सी ऍपबाबत काहीजण मुद्दामहून राजकारण करीत आहेत. परंतु अशांचे फावणार नसून, याविरुद्ध सरकार कारवाई जरूर करणार आहे. 2 जानेवारी रोजी मोपा विमानतळावरील टॅक्सी ऑपरेशन्सच्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा सरकार घेणार आहे आणि त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
मंत्री रोहन खंवटे म्हणाले, मांद्रेतील सुमारे एक हजारहून अधिक टॅक्सी ऑपरेटर यापूर्वीच गोवा टॅक्सी ऍपमध्ये सहभागी झाले आहेत. पेडणेतील व्यावसायिक जर या ऍपमध्ये सहभागी होण्यास राजी नसतील तर त्याचा फायदा इतरांना होईल आणि मग ते मागे राहतील. त्यामुळे पेडण्यातील लोकांनी विचार करण्याची गरज असून, गोवा टॅक्सी ऍपबाबत कोणताही गैरसमज न करून घेता या ऍपमध्ये सहभागी व्हायला हवे.
पेडण्यातील जनता सुज्ञ व प्रामाणिक आहे. तरीही काहीजण केवळ राजकारण करण्याच्या उद्देशाने गोवा टॅक्सी ऍपला विरोध करीत आहेत. परंतु पेडण्यातील व्यावसायिकांवर व जनतेवर आम्हाला विश्वास असून, लोक सरकारला सहकार्य करतील, अशी अपेक्षा मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली. काही टॅक्सी चालकांचे माफिया राज खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही मंत्री खंवटे यांनी दिला.