वृत्तसंस्था/ हिसार (हरियाणा)
येथे सुरू असलेल्या सहाव्या इलाईट पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा आशियाई स्पर्धेत विक्रमी सहा पदके मिळवणारा शिवा थापा तसेच 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कास्यपदक विजेता रोहित टोकास यांनी आपल्या वजन गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आसामचे प्रतिनिधीत्व करणाऱया शिवा थापाने 63.5 किलो वजन गटातील लढतीमध्ये दिल्लीच्या जसविंदर सिंगचा सरस गुणावर पराभव करत शेवटच्या आठ स्पर्धकामध्ये स्थान मिळवले. आता या गटात केरळचा सानू आणि पंजाबचा आशुतोष कुमार यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर थापाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. पुरुषांच्या 67 किलो वजन गटात रेल्वेचे प्रतिनिधीत्व करणाऱया रोहित टोकासने सेनादलाच्या जयसिंगचा 5-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. 80 किलो वजनगटात हिमाचल प्रदेशच्या आशिष कुमारने राजस्थानच्या सुमित पुनियावर 5-0 अशी एकतर्फी मात करत पुढील फेरीत स्थान मिळवले. 57 किलो गटात 2016 सालातील विश्व युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेतील चॅम्पियन सचिनने हरियाणाच्या नीरजचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. पोलीलस दलातील शिवम तिवारीने तेलंगणाच्या मिचेलचा पराभव केला. महाराष्ट्राच्या ऋषीकेश गौडने 57 किलो गटात बिहारच्या सोनूचा 5-0 त्याचप्रमाणे 51 किलो गटात कर्नाटकाच्या पवनकुमारने उत्तराखंडच्या पवनकुमार आर्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत विविध राज्यांचे सुमारे 386 स्पर्धक सहभागी झाले असून ही स्पर्धा 13 विविध वजन गटात घेतली जात आहे.