वृत्तसंस्था /राजकोट
2023 च्या रणजी क्रिकेट हंगामातील ब गटातील येथे झालेल्या सामन्यात सौराष्ट्रने दिल्लीचा 1 डाव आणि 214 धावांनी दणदणीत पराभव केला. सौराष्ट्रने हा सामना तीन दिवसात संपवित जादा बोनस गुण मिळविला.
या सामन्यात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनादकट याची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने या सामन्यात दिल्लीच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह 8 गडी बाद केले होते. तसेच रणजी स्पर्धेत पहिल्याच षटकात हॅटट्रिक साधणारा उनादकट हा पहिला गोलंदाज ठरला. यश धूलच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाची कामगिरी चांगली होऊ शकली नाही. गुरुवारी खेळाच्या तिसऱया दिवशी दिल्लीने आपल्या दुसऱया डावाला सुरुवात केली. पण सौराष्ट्रच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा दुसरा डाव 63.5 षटकात 227 धावात आटोपला. दिल्लीच्या दुसऱया डावामध्ये बदोनीने 40 तर शोकिनने 51 धावा जमविल्या. सौराष्ट्रच्या दोडियाने 91 धावात 5 गडी बाद केले. तत्पूर्वी सौराष्ट्रने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला होता. सौराष्ट्रने हा सामना खेळाच्या तिसऱयाच दिवशी जिंकला.
आंध्र आणि हैद्राबाद यांच्यातील सामन्यात आंध्रने पहिल्या डावात 135 धावा जमविल्यानंतर हैद्राबादचा पहिला डाव 195 धावात आटोपला. त्यानंतर आंध्रने दुसऱया डावात 462 धावांचा डोंगर उभा केला. हैद्राबादने गुरुवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर 2 बाद 75 धावा केल्या.
आसाम आणि महाराष्ट्र यांच्यात अंबी येथे सुरू असलेल्या रणजी सामन्यात आसामने पहिल्या डावात 275 धावा केल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्रने आपला पहिला व 9 बाद 594 धावांवर घोषित केला.