18 विदेशी प्राण्यांसह 139 प्राणी जप्त : तिघांना अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
कमर्शियल टॅक्स इंटेलिजन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बँकॉकहून बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या तीन प्रवाशांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 विदेशी प्राणी जप्त केले. यामध्ये 14 सरपटणारे प्राणी आणि 4 सस्तन प्राण्यांचा समावेश आहे. 22 जानेवारी रोजी बँकॉकहून बेंगळूरला आलेल्या विमानातून हे प्राणी आणण्यात आले होते. याप्रकरणी एका महिलेसह तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
बेंगळूरच्या केपेंगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार 22 रोजी बँकॉकहून आलेल्या तिघांनी साप आणि प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. कमर्शियल टॅक्स इंटेलिजन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या असता चार सस्तन प्राणी आणि 14 सरपटणारे प्राणी आढळून आले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे बेंगळूरमधील फार्महाऊसवर छापा टाकून 48 जातीचे 139 प्राणी जप्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
विमानतळावर अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये पिवळे आणि हिरव्या रंगाचे अजगर, पिवळे डोके असलेले अॅमेझॉन पोपट, नाईल मॉनिटर्स (घोरपड), लाल पायांचे कासव, सरडे, मगर, माकडे आणि रॅकून डॉग या प्राण्यांचा समावेश आहे. त्यांना सध्या बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे. कर्नाटक वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बेंगळूर विमानतळाच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी प्राण्यांच्या अवैध तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
बँकॉकमधून सरपटणारे प्राणी, पक्षी बेकायदेशीररित्या बेंगळूर शहरात आणून त्यांना चढ्या दराने विकून पैसे कमविण्याचा आरोपींचा हेतू असावा, असा संशय आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार विनापरवाना वन्य प्राण्यांची वाहतूक करण्यावर निर्बंध आहेत.