दोन्ही मंत्र्यांच्या निवेदनाच्या बातम्या, व्हिडिओ घेतले मागवून : येत्या दोन दिवसांत दोघांवरही कडक कारवाईची शक्यता
विशेष प्रतिनिधी /पणजी
म्हादई प्रश्नावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या निवेदनावरून संतप्त झालेल्या भाजपच्या गोव्यातील दोन मंत्र्यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेची भाजपने गंभीर दखल घेतली असून राष्ट्रीय स्तरावरून भाजपने गोव्यातील सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच मंत्र्यांनी सोशल मीडियावर केलेल्या निवेदनाचे व्हिडीयो गोव्यातून तातडीने मागावून घेतले आहेत. संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू केल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात अंतस्थ गटातून मिळालेल्या माहितीनुसार दोन मंत्र्यांनी सार्वजनिकरित्या भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत भाजपनेच पोहोचविली आहे. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनीही गोव्यातून माहिती मिळविली आहे.
कडक समज देण्याची सूचना
प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे संपूर्ण दिवसभर वाढदिवसानिमित्त व्यस्त असल्याने त्यांनी दोन मंत्र्यांना घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. मात्र भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना संपर्क साधून संबंधित मंत्र्यांना कडक समज देण्यास सांगितले आहे.
मंत्र्यांच्या टीकेमुळे सर्वच अडचणीत
भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेत्यावर उघडपणे टीका करण्याचे धाडस कोणी करीत नसतो. मंत्री नीलेश काब्राल आणि मंत्री सुभाष शिरोडकर या दोन्ही नेत्यांनी म्हादईप्रश्नी अमित शहा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे सर्व आमदार व मंत्री अडचणीत आले आहेत. गोमंतकीय जनतेचा विश्वासघात केल्याची जाणीव त्यांना झालेली आहे. मात्र सर्व मंत्र्यांनी तोंडाला कुलुपे लावली असताना मंत्री नीलेश काब्राल व मंत्री सुभाष शिरोडकर या दोन मंत्र्यांनी अमित शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याने गोमंतकीय जनतेने त्यांचे समर्थनही केले.
केद्रीय भाजपने घेतली दखल
या प्रकाराची गंभीर दखल केंद्रीय भाजप समितीने घेतली आणि दोन्ही मंत्र्यांची निवेदने व प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या प्रती गोव्यातून प्राप्त करून घेतल्या आहेत. बहुदा आज किंवा उद्या प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दोन्ही मंत्र्यांना भाजप कार्यालयात बोलावून घेऊन पक्षशिस्तीचे त्यांना धडे देण्याची शक्यता आहे. जेणेकरून यानंतर कोणालाही केंद्रीय नेत्यांवर टीका करता येणार नाही.
आजवर कोणाकडूनही अमित शहांवर टीका नाही
आजवर कोणीही नेत्यांनी तथा भाजपमधील मंत्र्यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शहा यांचे स्थान आहे. त्यामुळे नीलेश काब्राल, व सुभाष शिरोडकर या दोन मंत्र्यांनी केलेली टीका त्यांना भोवण्याची शक्यता भाजपमधील एका नेत्याने सोमवारी या प्रतिनिधीशी व्यक्त केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील संबंधित मंत्र्यांना कडक शब्दात समज देण्यास सांगितले जाणार आहे.