तीन दिवस भरणार यात्रा : प्रशासनासह यात्रा कमिटीकडून सज्जता : भाविकांसाठी जादा बसेसची सोय
वार्ताहर / दड्डी
कर्नाटक, महाराष्ट्रासह गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोदगे येथील भावेश्वरी देवी यात्रा महोत्सवास सोमवार दि. 6 पासून सुऊवात झाली. प्रतिवर्षाप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर पार पडणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
सोमवारी पहाटे देवीला महाभिषेक घालून विधिवत पूजा करून आरती होणार आहे. यानंतर भाविकांकडून नैवेद्य आणि दंडवत कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्त मोदगा गाव परिसरात मेवा मिठाई, खेळणी, नारळ, साखर-कापूर यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. सलग तीन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना यात्रेसाठी बेळगाव, संकेश्वर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज आदी भागातून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटकसह बेळगाव परिसर, महाराष्ट्रातील गडहिंग्लज, कोल्हापूर चंदगड, मुंबई भागातील लाखो भाविक भावेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दरवषी येत असतात. यासाठी मंदिर कमिटीने जय्यत तयारी केली आहे. पार्किंग व्यवस्था, पाणी आणि विजेची व्यवस्थाही कमिटी आणि प्रशासनावतीने केली आहे.
सोमवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. मंगळवारी शस्त्र इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह यात्रा कमिटीनेही खबरदारी घेताना उपाययोजना हाती घेतल्या आहेत. असे असले तरी भाविकांनीही सहकार्य करावे. दरम्यान घटप्रभा नदीला पाणी जादा असल्याने भाविकांनी मोदगे बंधाऱ्यावरून ये-जा करावी, असेही आवाहन यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.