पुणे / प्रतिनिधी :
कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हेही उतरले असून, मंगळवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कसब्यात भाजपाकडून हेमंत रासने, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली आहे. आता बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी बिचुकले यांनी विधानसभा, लोकसभेसह अन्य निवडणुका लढविल्या आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही निवडणुकीत ते विजयी होऊ शकलेले नाहीत.
अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचकुले म्हणाले, मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोवर निवडणूक लढवायची, ही माझी भूमिका आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतो. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे.
भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासारखे तगडे उमेदवार समोर असताना अभिजित बिचुकले कोणत्या मुद्यावर कसब्यातील मतदारांना साद घालणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.