वाघवडे येथे शेतकऱ्यांची बैठक : 10 रोजीच्या धरणे आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार
वार्ताहर/ किणये
वाघवडे-संतीबस्तवाड भागात रात्रीच्या वेळी सिंगलफेज विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. अनेकवेळा हेस्कॉमला निवेदन देऊनही हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे दि. 10 रोजी सकाळी हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनासंदर्भात वाघवडे येथे जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील होते संतीबस्तवाड, वाघवडे, किणये, मच्छे, पिरनवाडी, कर्ले भागात रात्रीच्या वेळी सिंगलफेज विद्युतपुरवठा देण्यात येत नाही. यामुळे शेत शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांनाही अंधाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही ठिकाणी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत. विद्युत पुरवठा नसल्यामुळे हा पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव ग्रामीण हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयात निवेदन देऊन रात्रीच्या वेळी सिंगल विद्युत पुरवठा देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.
निवेदन देऊनही याकडे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दि. 10 रोजी मच्छे-पिरनवाडी येथील विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्याची या विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येऊ लागली आहे. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. धरणे आंदोलनासंदर्भात माहितीचे निवेदन मच्छे, पिरनवाडी हेस्कॉम विभागीय कार्यालयाचे अधिकारी दीपानंद यांच्याकडे गेल्या दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी दिले आहे.. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंगल फेज विद्युत पुरवठा हवा आहे. त्यासाठी आता शेतकऱ्यांनीच ही लढाई लढायला हवी. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही काही जणांनी बैठकीत सांगितले. व धरणे आंदोलन करून रात्रीच्या विद्युत पुरवठा मंजूर करून घेण्याचे ठरविण्यात आले.