सायकल मार्गावर अतिक्रमण : स्मार्ट सिटीचा उद्देश असफल
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर (मार्ग) व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे बहुतांशी सायकल ट्रॅक व्यावसायिकांनी व्यापला आहे. त्यामुळे शहरात सायकल ट्रॅक व्यावसायिक ट्रॅक बनल्याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान या अतिक्रमित व्यावसायिकांना हटवून ट्रॅक मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक व सर्वसामान्यांतून होत आहे.
शहरात शिवबसवनगर, एपीएमसी, नेहरुनगर, आझमनगर, वंटमुरी कॉलनी, कणबर्गी रोड आदी ठिकाणी सायकल मार्ग उभारण्यात आला आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारणीला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र सायकल टॅकबरोबरच फुटपाथवरदेखील फळे आणि भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे सायकल चालविणाऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. सायकलप्रेमींसाठी उभारलेल्या सायकल मार्गाचा फायदा केवळ व्यावसायिकांना होऊ लागला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. स्मार्ट सिटीने शहरात उभारलेले सायकल ट्रॅक मनपाकडे वर्ग केले आहेत. दरम्यान सायकल मार्गाकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याने या मार्गावर व्यावसायिकांचे जाळे निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस या ट्रॅकवर व्यावसायिकांची संख्या वाढत असल्याने पूर्णपणे सायकल ट्रॅक झाकला जात आहे. त्यामुळे सायकलप्रेमींसाठी लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेला ट्रॅक आता केवळ व्यावसायिकांसाठी असल्याचे चित्र दिसत आहे.