ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करुन मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयातील कर्मचारीच हे बनावट लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे असून, माळवेला अटक करण्यात आली आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार कदम हे गोवंडी येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा लहान मुलगा रत्नजित याने व्हॉट्सॲपवर सरकारी जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजारांची मागणी केली. रत्नजितला मंत्रालयात मुलाखतीसाठी बोलावून तेथे शुभम मोहिते याच्याशी भेट घालून दिली. मोहितेने तो मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई असल्याचे सांगितले. मंत्रालयात कांबळे नावाच्या व्यक्तीला भेटून कागदपत्रे दिली. त्याने कागदपत्रे तपासली. 1 डिसेंबर 2021 रोजी धनंजय मुंडे यांच्या नावाचे बनावट आदेशपत्र रत्नजितला मेल केले. तात्पुरत्या स्वरूपात निवड झाली असून, 29 जानेवारी 2021 पर्यंत सदर कार्यालयात उपस्थित राहून नोकरी आदेश प्राप्त करून सेवेस प्रारंभ करण्यास सांगितल्याचे त्यात नमूद होते. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. या प्रकरणात संबंधित तरुणाची सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती आहे.
संबंधित तरुणाला देण्यात आलेल्या बनावट नियुक्ती आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन रघुनाथराव होनवडजकर यांनी सांगितले.
अधिक वाचा : परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. अशी कोणतीही व्यक्ती आमच्याकडे कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र कधीही दिले जात नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.