शनिवारपासून मिरामार येथे योग महोत्सव : मानस साहू साकारणार शिवपिंडी देखावा,शिवभक्तांना शिवजलाभिषेकाची दुर्मीळ संधी प्रख्यात गायक कैलास खैर यांचे शिवभजन
पणजी : यंदाची महाशिवरात्री गोमंतकीयांसाठी एक वेगळीच आध्यात्मिक पर्वणी देणारी ठरणार आहे. या शिवरात्रीपर्वानिमित्त महान तपस्वी योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे तब्बल तीन दिवस भगवान परशुरामाच्या या पवित्र पावन भूमित वास्तव्य राहणार आहे. तसेच त्यांच्या पावन सानिध्याचा लाभ तमाम गोमंतकीयांना घेता येणार आहे. मिरामार किनाऱ्यावर खास स्थापन करण्यात येणाऱ्या 12 शिवलिंगांवर जलाभिषेकाचीसुद्धा दुर्मिळ संधी गोमंतकीयांना प्राप्त होणार आहे. सुमारे एका तपानंतर अशाप्रकारे गोमंतकीयांना महाराजांच्या दर्शनाची संधी प्राप्त होणार असून प्रत्येकाने तिचे सोने करावे, असे आवाहन पूज्य स्वामी परमार्थ देव यांनी केले आहे. मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी भारत स्वाभिमान संघटनेचे राज्य प्रभारी कमलेश बांदेकर, पतंजली गोवा समितीचे विश्वास कोरगावकर, युवा भारत शाखेचे अध्यक्ष हनी सिंग, भारत स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश पऊळेकर आदींची उपस्थिती होती.
मिरामार येथे योग महोत्सव
मिरामार समुद्रकिनारी दि. 18, 19 व 20 असे तीन दिवस होणाऱ्या या योग महोत्सवात सुमारे 20 ते 35 हजार लोक सहभागी होतील अशी माहिती स्वामी परमार्थ देव यांनी दिली. त्यानिमित्त प्राणायाम, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा आदी शिबिरांचे आयोजन होणार आहे.
मानस साहू साकारणार शिवपिंडी देखावा
गोवा सरकारच्या सहयोगाने आयोजित या महोत्सवात दि. 18 रोजी पहिल्या दिवशी मिरामार समुद्रकिनारी महाशिवरात्रीला शिवजलाभिषेक व शिवपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ओरिसा येथील विश्व विख्यात वाळू शिल्पकार मानस साहू हे शिवपिंडीचा देखावा साकारणार आहेत.
शिवभक्तांना शिवजलाभिषेकाची दुर्मिळ संधी
यावेळी 12 शिवपिंडीची स्थापना अभिषेकासाठी करण्यात येऊन सर्व भाविकांना या महाशिवरात्री दिवशी समुद्र तटावरती शिवजलाभिषेकाची दुर्मिळ संधी प्राप्त होणार आहे. हा जलाभिषेकाचा कार्यक्रम तपोभूमीच्या पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
कैलास खैर यांचे शिवभजन
याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसिद्ध शिवस्तुती गायक कैलास खेर यांच्या शिवभजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी गोव्यातील संतमंडळी उपस्थित राहून सत्संग व शिवभजनाचा सुरेख संगम समुद्र तटावर अनुभवायला मिळणार आहे. योग शिबिर दररोज पहाटे 5 वा. सुरू होऊन 7.30 वाजता त्याची सांगता होणार आहे. पूज्य स्वामी रामदेवजी महाराज हे शिबिरस्थळी ब्रह्ममुहूर्ती पावणे पाच वाजता उपस्थित राहणार आहेत. सर्व योग प्रेमींनीही त्याच दरम्यान शिबिरस्थळी पोहोचावे, अशी विनंती स्वामी परमार्थ देव यांनी केली.
आयुर्वेद हे मानवतेला वरदान
आज संपूर्ण जग अनेक व्याधींनी व असाध्य रोगांनी त्रस्त झाले आहे. कोरोना काळानंतर हार्ट अॅटॅक, संधिवात, चर्मरोग व कॅन्सर सारख्या असाध्य रोगांनी डोके वर काढले आहे. अशावेळी योग आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्सा हेच मानवतेला एक वरदान आहे व पूज्य स्वामी रामदेवजी महाराज हाच संदेश घेऊन संपूर्ण भारतभरात यात्रा करणार आहेत. याचा शंखनाद दि. 18 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात येणार आहे. सनातन धर्म संघ व पूज्य स्वामी ब्रह्मदेशानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण आयोजन करण्यात येत आहे. त्याशिवाय या आयोजनात सर्व धार्मिक सामाजिक व सनातन परिवारातील संघटना एकसंघ होऊन संपूर्ण समाजाला योगाचा संदेश देणार आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.