पुणे / प्रतिनिधी :
खवय्यांची पसंती असलेल्या हापूस आंब्याचे पुण्यात आगमन झाले आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक सुरू झाली असून, कोकणातून दररोज 10 ते 15 पेटय़ांची आवक होत आहे. हापूस आंब्यांचा हंगाम नियमित सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, पाच डझनाच्या पेटीला 21 हजार रुपये इतकी उच्चांकी दर मिळाला आहे.
हापूस आंब्यांची आवक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होईल. सध्या फळ बाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक होत असून, दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हापूसची आवक वाढून दर सामान्यांच्या आवाक्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील हापूस आंब्यांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे यांच्या गाळय़ावर हापूस आंब्यांच्या पाच डझनाच्या सहा पेटय़ांची आवक झाली. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील आंबा बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतून आंब्यांच्या पेटय़ा विक्रीसाठी पाठविण्यात आल्या. आंब्यांच्या पेटय़ांचा लिलाव झाला. पाच डझनाच्या एका पेटीला 21 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला. व्यापारी युवराज काची यांनी आंब्याच्या पेटीची खरेदी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या हस्ते पेटय़ांचे पूजन करण्यात आले. या वेळी तरकारी विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे, फळ विभागप्रमुख दत्तात्रेय कळमकर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, माजी उपाध्यक्ष अमोल घुले, गणेश यादव आदी उपस्थित होते.
मार्चपासून आंब्यांची नियमित आवक सुरू
यंदा हापूस आंबा लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. फळधारणा चांगली झाली असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंब्यांची नियमित आवक सुरू होईल, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.