पुणे / वार्ताहर :
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) कायमस्वरुपी नोकरी आणि इलेक्ट्रिक वर्क टेंडर मिळवून देण्याच्या आमिषाने भामटय़ांनी एकाला 28 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी दोघांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद गोविंद वझे (रा. कोंढवे धावडे, उत्तमनगर, पुणे) व परमेश्वर अंकुश शिंदे (रा. सिंहगड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात विजय योगीराज साखरे (वय 42, रा. नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2022 ते 15 ऑक्टोबर 2022 यादरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद वझे व परमेश्वर शिंदे यांनी आपसात संगनमत करुन तक्रारदार विजय साखरे यांची पत्नी व नातेवाईक यांना एनडीएमध्ये कायमस्वरुपी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. तसेच एनडीएमधील इलेक्ट्रिक वर्क टेंडर मिळवून देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात वेळोवेळी एकूण 28 लाख रुपये घेतले. परंतु त्यांच्या पत्नी किंवा नातेवाईकांना नोकरी न लावता किंवा इलेक्ट्रिक टेंडरची ऑर्डर मिळवून न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जाधव करत आहेत.
अधिक वाचा : कसब्याची जागा भाजपकडून जाईल