विंडीजचा 87 धावांनी पराभव, रबाडाचे 6 बळी, मार्करम सामनावीर
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
यजमान दक्षिण आफ्रिकेने विंडीज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. पहिल्या कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने विंडीजचा 87 धावांनी पराभव केला. विंडीजच्या दुसऱया डावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने 50 धावात 6 बळी मिळविले. द. आफ्रिकेचा ऍडेन मार्करम याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात द. आफ्रिकेने पहिल्या डावात 342 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 212 धावात आटोपला. द. आफ्रिकेने 130 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव विंडीजने 28 षटकात 116 धावात गुंडाळला. विंडीजतर्फे रॉचने 5 तर जोसेफ आणि होल्डर यांनी प्रत्येकी 2 तसेच गॅब्रियलने 1 गडी बाद केला. विंडीजला निर्णायक विजयासाठी 247 धावांची जरुरी होती. पण रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा दुसरा डाव 41 षटकात 159 धावात आटोपल्याने द. आफ्रिकेने हा सामना 87 धावांनी जिंकून या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. विंडीजच्या दुसऱया डावात ब्लॅकवूडने एकाकी लढत देत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 79, होल्डरने 4 चौकारांसह 18, डिसिल्वाने 3 चौकारांसह 17 आणि चंद्रपॉलने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. रबाडाला जेनसन आणि नॉर्त्जे यांच्याकडून बऱयापैकी साथ मिळाली. जेनसनने 33 धावात 2 तर नॉर्त्जे आणि कोझी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. विंडीजच्या दुसऱया डावात रबाडाने रॉचला 12 धावांवर पायचीत करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल असल्याचे जाणवले. दोन्ही संघातील वेगवान गोलंदाज या कसोटीत प्रभावी ठरले. सामन्याच्या तिसऱया दिवशी एकूण 16 बळी नोंदविले गेले. आता या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी बुधवार दि. 8 मार्चपासून जोहान्सबर्ग येथे सुरू होणार आहे. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर कसोटीमध्ये यजमान द. आफ्रिकेची दुसऱया डावातील 116 ही निचांकी धावसंख्या आहे. द. आफ्रिका संघाच्या कर्णधारपदी बवुमाची नियुक्ती केल्यानंतर द. आफ्रिकेने मिळविलेला हा पहिला विजय आहे. मात्र, बवुमाला या कसोटीतील दोन्ही डावात आपले खाते उघडता आले नाही.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका प. डाव 86.3 षटकात सर्वबाद 342, विंडीज प. डाव 69 षटकात सर्वबाद 212, द. आफ्रिका दु. डाव 28 षटकात सर्वबाद 116, विंडीज दु. डाव 41 षटकात सर्वबाद 159 (ब्लॅकवूड 79, होल्डर 18, डिसिल्वा 17, रॉच 12, चंद्रपॉल 10, रबाडा 6-50, जेनसेन 2-33, नॉर्त्जे 1-48, कोझी 1-20).