कुंकळ्ळी ; वेरोडा-कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानचा वार्षिक छत्रोत्सव शुक्रवार 10 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी महाभिषेक, इतर धार्मिक विधी, दुपारी आरती होणार असून त्यानंतर पालखी मिरवणुकीपूर्वी पाच छत्र्या रंगीबेरंगी कपडा-खण, फुलांनी सजविण्यात येतील. दुपारी 2.30 च्या सुमारास देवीच्या मूर्तीला पालखीत स्थानापन्न करण्यात आल्यानंतर गुलाल उधळून ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ होईल. भाविकांकडून गुलालाची उधळण होत पालखी मिरवणूक मंदिराकडून पारंपरिक वाटेने केगदीकटा, सांवरकट्टा येथील मुख्य स्थळी येईल. तेथील पिंपळापेडजवळ सजविलेल्या जागी भाविकांना दर्शन देण्याचा, महिलांकडून हळदीकुंकू व ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर पालखी पुढे निघेल. त्याआधी भाविक एकमेकांना गुलाल लावण्यात दंग होऊन जातात. ढोलताशांच्या गजरात पाच छत्र्या नाचविण्यात युवकही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
वरील स्थळाकडील कार्यक्रम आटोपल्यानंतर पालखीच्या परतीच्या वाटेत आंगडी-कोटावळ या पारंपरिक स्थळी तलवडा येथील श्री रामनाथ संस्थानकडून पोहोचलेला श्री रामनाथ आणि श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण देवी यांच्या अपूर्व असा भेटीचा कार्यक्रम होईल. तेथे आरती, ओवाळणी, पारंपरिक विधी झाल्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन होईल. मंदिरात आरती, प्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल. दरम्यान, देवीच्या आगमनाप्रित्यर्थ केगदीकटा-सांवरकट्टा येथील मंडपात माटोळीला बांधलेल्या फळांची पावणी शनिवार 11 रोजी सायं. 6 वा. होणार असून याप्रसंगी इतर कार्यक्रमही होतील. तरी छत्रोत्सवात देवीच्या भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान समितीचे अध्यक्ष गौरीश फडते, सचिव राहुल देसाई, कोषाध्यक्ष प्रकाश देसाई व मुखत्यार दामोदर देसाई यांनी केले आहे