लायन्स क्लबच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त शिबिराचे आयोजन
बेळगाव : मधुमेह, अपघात, गँगरिंग यामुळे दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या नागरिकांसाठी ‘लायन्स क्लब ऑफ बेळगाव’ व ‘ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन महावीर लिंब सेंटर’च्यावतीने मोफत जयपूर फूट शिबिराचे आयोजन केले आहे. लायन्स क्लब ऑफ बेळगावला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा उपक्रम राबविला जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे ‘महावीर लिंब सेंटर’चे अध्यक्ष महेंद्र सिंकी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. लायन्स क्लब ऑफ बेळगाव या सामाजिक संस्थेच्यावतीने अनेक उपक्रम आजवर राबविण्यात आले आहेत. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त यावषी कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश यासह इतर राज्यांमध्ये ‘महावीर लिंब सेंटर’तर्फे 45 हजार नागरिकांना कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती नसल्यामुळे त्यांना कृत्रिम अवयवांची माहिती नसते. यासाठी अधिकतर ग्रामीण भागात पोहोचण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येणार असून इच्छुकांनी नावनोंदणी करावयाची आहे. दिव्यांगत्वानुसार कृत्रिम अवयवांचे माप घेऊन शिबिरामध्ये त्यांना कृत्रिम अवयव दिले जाणार आहेत. दिव्यांगांनी 9964247171 या क्रमांकाशी 21 मार्चपूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी गौतम गुलेछा, लायन्स क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रविंद्र काकती, प्रभाकर शहापूरकर, सुभाष डंक यांसह इतर सदस्य उपस्थित होते.