जिल्ह्यात दारिद्र्यारेषेखालील 7702 कुटुंबे लाभार्थी : 75 युनिटपर्यंत मोफत वीज : लाभ घेण्याचे हेस्कॉमचे आवाहन
बेळगाव : अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना वीज मिळावी, यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अमृत ज्योती विद्युत योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्येक कुटुंबाला 75 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. जिल्ह्यात 7,702 कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. मागील वर्षी 1 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने अमृत ज्योती योजना जाहीर केली. राज्यातील अधिकतर ग्रामीण भागात आजही गरीब कुटुंबांकडे वीज नाही. वीजबिल भरणेही त्यांना शक्य नसल्याने अशा कुटुंबांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी अमृत ज्योती योजना सुरू करण्यात आली. सेवा सिंधू सॉफ्टवेअरमधून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. जिल्ह्यात 72 हजार 270 कुटुंबांनी नोंदणी केली. हेस्कॉमने अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांकडून दारिद्र्या रेषेखालील कुटुंबांची माहिती उपलब्ध करून घेतली. त्यातून अर्जांची छाननी करत मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत 7 हजार 702 लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली. हेस्कॉमअंतर्गत सात जिल्ह्यांचा समावेश होतो. एकूण 2 लाख 15 हजार 345 कुटुंबांनी नोंदणी केली होती. यापैकी धारवाड जिल्ह्यात 18 हजार 518, गदग 18 हजार 036, हावेरी 30 हजार 326, उत्तर कन्नड 15 हजार 729, बागलकोट 34 हजार 503, विजयपूर 25 हजार 963 लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अर्जांची पडताळणी करत अंतिम यादी तयार केली.
75 युनिटपर्यंत मोफत वीज
अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना 75 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. प्रत्येक महिन्यात आलेले संपूर्ण वीजबिल ग्राहकाला भरावे लागते. त्यानंतर हेस्कॉमकडून लाभार्थ्यांची यादी सरकारला दिली जाते. 75 युनिटपर्यंतची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाते. य् ाा योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी ग्राहकांना बीपीएल रेशनकार्ड, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्राहकांकडून बँक खात्याची माहिती घेऊन ती सरकारला दिली जाते. त्यामुळे सरकारकडून जमा होणारी रक्कम थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते.
बेळगावसह हेस्कॉम विभागात उत्तम प्रतिसाद
अमृत ज्योती योजनेला बेळगावसह हेस्कॉम विभागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची अंमलबजावणी वेगाने होत असून लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
– मोहम्मद रोशन, व्यवस्थापकीय संचालक, हेस्कॉम