पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर यांच्यासह शिक्षण, हॉटेल, संशोधन, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा या समितीमध्ये समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या पाककृतीची निश्चिती 2011 मध्ये करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या अहवालातून विद्यार्थ्यांचा बॉडी मास कमी जास्त असणे, विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी-जास्त असणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत. तसेच केंद्र शासनाने स्थानिक उपलब्ध होणाऱ्या स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा समावेश करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेश्वर, आघारकर संशोधन संस्थेतील प्रसाद कुलकर्णी, आहारतज्ञ पूनम कदम, व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, पोषणतज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे, महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतील प्रतिनिधी, पोषणशक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक वैभव बारेकर, राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाळ यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : खूशखबर! महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत लागू