सातारा प्रतिनिधी
एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन दि. 25 रोजी दहावीचा शेवटचा पेपर आहे त्याच दिवशी पेपर संपल्यानंतर मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांला उचलून नेवून कोयत्याने खून करण्याचा प्लॅन करणाऱ्या पाच जणांची वाई पोलिसांनी उचलबांगडी केली. विशेष म्हणजे यामध्ये चार जण हे अल्पवयीन आहेत. त्या पाच जणांकडून पोलिसांनी खून करण्यासाठी आणलेला कोयताही हस्तगत केला आहे. पोलिसांच्या डिटेक्शनमुळे होणारा अनर्थ टळला असून याबाबत वाई पोलिसांचे वाई तालुक्यातून कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की वाई शहरातील काही मुले ही वेळे येथील एका दहावीतल्या युवकाचा खून करणार आहेत. त्याबाबतची सर्व माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिली. त्यांनी दिलेल्या सुचनाव मार्गदर्शनानुसार त्या माहितीची शहानिशा करुन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सुचना डीबी पथकास दिल्या होत्या. त्यानंतर एपीआय आशिष कांबळे व डीबी पथकांने वाई शहरात व वेळे येथे खास खबरे नेमून संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवली. त्यांना वेदांत मच्छिंद्र डोंगरे (वय 19, रा. सिद्धनाथवाडी) व त्यांचे चार अल्पवयीन युवकांनी खुनाचा कट रचल्याची माहिती समजली होती. त्यानंतर दि. 21 रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या आदेशानुसार एपीआय आशिष कांबळे व डीबी पथकाने त्या पाचजणांना वाई आणि वेळे येथून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी वेळे येथील दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांची एक महिन्यापूर्वी भांडणे झाली होती. त्यामुळे त्याला दहावीच्या शेवटचा पेपर दि. 25 रोजी आहे. त्याच दिवशी पेपर संपल्यानंतर त्याला उचलून नेवून कोयत्याने वार करुन खून करण्याचा कट केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खून करण्यासाठी आणलेला कोयताही हस्तगत केला आहे. पाच जणांच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास एपीआय आशिष कांबळे हे तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे – खराडे याच्ंया मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, एपीआय आशिष कांबळे, डीबीचे विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी केली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
वाई पोलीस ठाण्याच्या डीबी टीमची चौफेर नजर
वाई पोलीस ठाण्याच्या डीबी पथकांची वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या प्रत्येक गावात वाई शहरात चौफेर नजर असते. नेमक्या गुन्हेगारांपर्यंत जाण्याचे कसब या पथकास असून गुन्हा घडायच्या आधीच गुन्हेगारांची उचलबांगी केल्याबद्दल वाई शहरासह तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.