इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून 7 प्रकरणात जामीन मंजूर
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा एकदा अटकेतून दिलासा मिळाला आहे. 18 मार्च रोजी न्यायिक संकुलात झालेल्या हिंसाचारप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी खान यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात इम्रान यांच्यावर एकूण सात खटले दाखल झाले होते. सातही गुह्यांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या प्रकरणात खान यांना अटक केली जाणार नाही. यापूर्वी लाहोर न्यायालयाने त्यांना 9 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला होता.
18 मार्च रोजी इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहणार होते. सुरक्षेचा हवाला देत त्यांनी न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयात हजर राहताना जीवाला धोका असल्यामुळे फेडरल ज्युडिशियल कॉम्प्लेक्समध्ये सुनावणीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने इम्रानचे अपील मान्य केल्यानंतर शेकडो समर्थकांसह ते संकुलात पोहोचले. येथे त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार करून लाखो रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी इम्रान खान यांना अटक झाली नसली तरी त्यांच्या 32 समर्थकांना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांवर 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सातही प्रकरणांची सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन मंजूर करताना खटल्याच्या पुढील सुनावणीदरम्यान पुन्हा हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ओमर फारुक आणि न्यायमूर्ती मिनागुल हसन यांनी दिले आहेत.
यापूर्वी 9 प्रकरणांमध्ये जामीन
याआधी गेल्या आठवडय़ात इम्रानने लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. येथे न्यायालयाने त्यांना 9 प्रकरणांमध्ये संरक्षणात्मक जामीन दिला होता. इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या पाच खटल्यांसाठी न्यायालयाने खान यांना 24 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला होता. त्याचवेळी, लाहोरमध्ये सुरू असलेल्या तीन खटल्यांसाठी त्यांना 27 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला. इम्रानच्या अटकेवरून 14-15 मार्च रोजी जमान पार्कच्या बाहेर पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याशी संबंधित ही प्रकरणे आहेत.