आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर करणार
वृत्तसंस्था /अहमदाबाद/ लखनौ
उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद याला सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता प्रयागराजच्या नैनी कारागृहात पोहोचवण्यात आले. अतिकचा मुलगा अली अहमद हाही या कारागृहात बंद आहे. उमेश पाल अपहरण प्रकरणी अतिकला मंगळवारी विशेष खासदार/आमदार न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच प्रकरणात त्याचा भाऊ अशरफ यालाही बरेलीहून प्रयागराजला आणण्यात आले आहे.
माफिया अतीक अहमद याला सुरक्षेच्या कारणावरून गुजरातमधील कारागृहात ठेवण्यात आले होते. आता उत्तर प्रदेशातील एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याला उत्तर प्रदेशात आणण्यात आल्याचे समजते. त्याला राज्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश एसटीएफचे अधिकारी आणि 30 सशस्त्र जवान 26 मार्च रोजी सकाळी अहमदाबादला पोहोचले होते. गुजरात पोलिसांकडून रविवारी दुपारी 4 वाजता ताबा घेतल्यानंतर सायंकाळी 5.45 वाजता साबरमती कारागृहातून उत्तर प्रदेशकडे मार्गस्थ करण्यात आले. सोमवारी सायंकाळी माफिया अतिक अहमदला उत्तर प्रदेशातील नैनी कारागृहात पोहोचवण्यात आले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गुजरात ते उत्तर प्रदेश हा 1,300 किलोमीटरचा प्रवास जवळपास 24 तासात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
अतिक अहमदला मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रयागराज न्यायालयात हजर केले जाणार आहे. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अतिक अहमदला न्यायालयात हजर करा, असे आदेश न्यायालयाने दिला आहे. 28 मार्च रोजी सकाळी 11:00 वाजता अतिक अहमदला न्यायालयात हजर करा, असे आदेश खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायाधीश दिनेशचंद्र शुक्ला यांनी दिले आहेत.
‘उमेश पाल’शी संबंधित प्रकरण
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिकने 2006 मध्ये उमेश पाल यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले होते. उमेशने माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्याविऊद्ध 2007 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. प्रयागराजचे विशेष खासदार/आमदार न्यायालय 28 मार्च रोजी या प्रकरणी निकाल देणार आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफने आरोपी अतिक याला न्यायालयात हजर करण्यासाठी प्रयागराजला आणले आहे.
आम्हाला सुरक्षेची चिंता : वकील
न्यायालयाच्या आदेशानुसार अतीक अहमदला प्रयागराज न्यायालयात आणण्यात आले आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. मात्र, आम्हाला अतिक अहमदच्या सुरक्षेची काळजी असल्याचे अतिकचे वकील विजय मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
अतिकच्या व्हॅनला गायीची धडक
मध्यप्रदेशातील शिवपुरी जिह्यात अतिकला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर गायीची धडक झाली. यात गायीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सुमारे 15-20 सेकंद हा वाहनताफा येथे थांबला. तसेच चोवीस तासांच्या प्रवासात अतीक अहमदला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात वेळोवेळी बदलही करण्यात आला. या प्रवासात प्रसारमाध्यम प्रतिनिधींना चकमा देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची कसरत सुरू होती.