शॉर्टसर्किटमुळे आग : लाखो रुपयांचे साहित्य खाक
बेळगाव : शहरातील मेणसी गल्ली येथील स्टेशनरी दुकानांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. सुदैवानेच या घटनेत शेजारील इमारतींना मोठा फटका बसला नाही. अन्यथा मोठी हानी झाली असती. सदर आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. मेणसी गल्ली येथील दर्शन नॉव्हेल्टी आणि उत्तम नॉव्हेल्टी या दुकानांना आग लागली. यामध्ये स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले आहे. सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान धूर येत असल्याचे काहीजणांना दिसले. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र तोपर्यंत या दुकानांतील साहित्याने पेट घेतला.पहिल्या मजल्यावर भारत शहा यांचे दर्शन नॉव्हेल्टी हे दुकान आहे तर ग्राऊंड फ्लोअरवर महिलासिंग रजपूत यांचे उत्तम नॉव्हेल्टी हे दुकान आहे. शॉर्टसर्किटने अचानक ही आग लागली. पाण्याचा बंब घटनास्थळी दाखल झाला. पाणी फवारणी करून आग आटोक्यात आणली. मात्र स्टेशनरी साहित्य असल्यामुळे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मार्केट पोलीस स्थानकामध्ये घटनेची नोंद झाली आहे.