मडगाव पालिका बैठकीत निर्णय : सोनसडा यार्डातील सुविधांसाठी 14 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यास मंजुरी
मडगाव : घरोघरी कचरा उचल करण्याचे काम मडगावातील प्रभागांमध्ये ‘बापू एनव्हायरोमेंटल’, तर फातोर्डातील प्रभागांत ‘ग्रीन ग्लोबल’ या पूर्वीच्याच यंत्रणांना देण्याचा निर्णय मंगळवारी सकाळी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याखेरीज सोनसडा कचरा यार्डातील अन्य सुविधा जाग्यावर घालण्यासाठी 14 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यास मंजुरी मिळविण्यात आली. आगीत जळून गेलेला ट्रान्सफॉर्मर वीजखाते निविदा काढून पुन्हा बसविणार आहे. त्यासाठी पालिकेला 14 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतील सुमारे 52 लाख ऊ. वीज खात्याकडे जमा करण्यात येणार आहेत. त्यास चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. नगरसेवक घनश्याम शिरोडकर, सदानंद नाईक, लिंडन पेरेरा, फ्रान्सिस जोनास यांनी या चर्चेत भाग घेतला. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. उपनगराध्यक्षा दिपाली सावळ व अन्य नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. सोनसड्यासंबंधी याचिकेवर सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या लेविन्सन मार्टीन्स यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला कृती आराखडा पालिका मंडळासमोर ठेऊन त्यास मंजुरी मिळविण्यात आली. उच्च न्यायालयात कागदपत्रे सादर करताना ती आधी पडताळून पाहा व नंतरच सादर करा. अन्यथा अधिकाऱ्यांसह नगरसेवकांना न्यायालयाच्या नोटिसांना सामोरे जावे लागेल, असे यावेळी नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी स्पष्ट केले. यापुढे सर्व न्यायालयीन व्यवहार रीतसर करा, असा सल्ला त्यांनी दिला. पालिकेने ठराव घेऊन सोनसड्याचा ताबा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे दिला होता. त्यामुळे सोनसड्यावर विकासकामे तसेच दुरुस्तीकामे महामंडळाने करणे आवश्यक असल्याचा मुद्दा नगरसेवक पेरेरा यांनी उपस्थित केला. परंतु पालिकेने घेतलेला सदर ठराव सरकारकडून ग्राह्य धरण्यात आला नव्हता, असा खुलासा तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार पालिका सोनसडा यार्डातील कामे हाताळत असल्याचे स्पष्ट केले.
सोनसड्यासंदर्भातील कागदपत्रे, पत्रव्यवहारांच्या प्रती नगरसेवकांना देणार
सोनसड्यासंदर्भात पालिकेकडून सरकारला आणि न्यायालयात सादर करण्यात येणारी कागदपत्रे तसेच यासंदर्भात पालिकेशी होणाऱ्या पत्रव्यवहारांच्या झेरॉक्स प्रती यापुढे सर्व नगरसेवकांना उपलब्ध कराव्यात, अशी मागणी नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी केली असता नगराध्यक्ष शिरोडकर यांनी ती मंजूर केली. यामुळे नगरसेवकांना सोनसड्यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक मातिही मिळणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.