वृत्तसंस्था/ लंडन
सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू असल्याने या देशांच्या खेळाडूंवर विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांनी बंदी घातली होती. दरम्यान, ब्रिटनच्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम आयोजकांनी आता रशियन आणि बेलारुसच्या टेनिसपटूंना या स्पर्धेमध्ये त्रयस्थ टेनिसपटू म्हणून सहभागी होण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. तसेच त्यांच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रत्येक वर्षी विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जुलै महिन्यात लंडनमध्ये घेतली जाते. आता यावेळी बेलारुस आणि रशियन टेनिसपटूंना या स्पर्धेत त्रयस्थ टेनिसपटू म्हणून सहभागी होता येईल. त्यांच्यासाठी सोयीस्कर नियमावली तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रशिया आणि बेलारुसच्या टेनिसपटूंवर विम्बल्डनने बंदी घातल्याने त्यांना मानांकन गुणात खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र, विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होताना बेलारुस आणि रशियन टेनिसपटूंना अत्यावश्यक नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. टेनिसपटूंवरील बंदी शिथिल केल्याने भविष्यकाळात या देशांच्या टेनिसपटूंना पुन्हा सदस्यत्व प्राप्त होईल. मध्यंतरी क्विन्स क्लब, ईस्टबोर्न बर्मिंगहॅम आणि नॉटिंगहॅम या स्पर्धा या समस्येमुळे रद्द कराव्या लागल्या होत्या.