प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात मुस्लीम बांधवांकडून शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पारंपरिक पद्धतीने अंजुमन येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी 9 वा. सामुदायिक नमाज झाल्यानंतर एकमेकांना गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
मुस्लीम बांधवांनी श्रद्धा आणि भावनेने रोजे करून रमजान ईद उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरी केली. मुस्लीम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून नमाज पठण केले. महिन्याभरापासून रमजाननिमित्त बाजारात कपडे, टोप्या, अत्तर, सुरमा, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, सुकामेवा, शेवया, खजूर आदींची खरेदीदेखील वाढली होती.
विशेषत: शनिवारी शिरखुर्म्यासाठी दूध, शेवया आणि सुकामेव्याची मागणी वाढली होती. मुस्लीम बांधवांनी आपल्या नातेवाईकांना शिरखुर्मा देऊन शुभेच्छा दिल्या.