वृत्तसंस्था/ मियामी, अमेरिका
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या एफ वन मियामी ग्रां प्रि शर्यतीत नवव्या स्थानावरून सुरुवात करूनही जेतेपद पटकावले. मात्र यामुळे त्याचा संघसहकारी सर्जिओ पेरेझची चॅम्पियनशिपमध्ये आघाडी घेण्याची संधी हुकली. अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने तिसरे स्थान मिळविले.
अझरबैजानमधील शर्यतीत पेरेझने यश मिळवित व्हर्स्टापेनची चॅम्पियनशिप आघाडी केवळ 6 गुणांवर आणली होती आणि यावेळी त्याला मागे टाकण्याची पेरेझला चांगली संधी होती. पात्रता फेरीवेळी व्हर्स्टापेनकडून चूक झाली होती, त्यामुळे पोल पोझिशनवरील पेरेझला येथे जेतेपदाची संधी होती. पण व्हर्स्टापेनने जबरदस्त ड्रायव्हिंग करीत पेरेझला केवळ 5 सेकंदांनी मागे टाकत येथे जेतेपद पटकावून आपली आघाडी 14 गुणांवर नेली.
अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने तिसरे, मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने चौथे व लेविस हॅमिल्टनने सहावे स्थान मिळविले. फेरारीच्या कार्लोस सेन्झने पाचवे, त्याचाच संघसहकारी चार्लस लेक्लर्कने सातवे, अल्पाईनच्या पीयर गॅसलीने आठवे व एस्टेबन ओकॉनने नववे, हासच्या केविन मॅग्नसेनने दहावे स्थान मिळविले.