रत्नागिरी प्रतिनिधी
ओएलएक्स ॲपच्या जाहीरातीतील फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने फ्लॅट मालकाला 80 हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना 12 मे 2023 रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. स्वप्नील बाळासाहेब येलुरकर (38, रा. जागुष्टे कॉलनी, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आपले घर भाड्याने देण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. ही जाहिरात वाचून दीपक पवार नावाच्या इसमाने तक्रारदार यांना फोन केला. तुमचा फ्लॅट मला आवडला असून तो फ्लॅट घेण्यास मी इच्छुक आहे, अशी बतावणी केली. त्यासाठी गुगल पे करण्याच्या बहाण्याने तक्रारदार यांच्या खात्यामधील 16 हजार व नंतर 48 हजार असे एकूण 80 हजार रूपये काढून घेतले.
दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शहर पोलिसांत तकार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी दीपक पवार याच्याविरूद्ध भादंवि कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केल़ा पोलिसांकडून वारंवार आपले बँक डिटेल्स अन्य कोणालाही पाठवू नका, असे सातत्याने आवाहन करण्यात येत असते, असे असतानाही बँक डिटेल्स व खात्याबाबत इतर माहिती अनोळखी व्यक्तींकडे उघड केली जाते. यामुळे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर आल़े दरम्यान अशाप्रकारे फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.