राजस्थानचा अवघ्या 59 धावांत धुव्वा : सामनावीर वेन पार्नेलचे 10 धावांत 3 बळी, डु प्लेसिस, मॅक्सवेलची अर्धशतके
वृत्तसंस्था/ जयपूर
येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने यजमान राजस्थान रॉयल्सवर 112 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना मोठ्या फरकाने जिंकताना आरसीबीने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. याशिवाय, त्यांनी प्लेऑफमधील आशाही कायम ठेवल्या आहेत. प्रारंभी, आरसीबीचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या. यानंतर आरसीबीच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा डाव 10.3 षटकात 59 धावांत खुर्दा झाला. 10 धावांत 3 बळी टिपणाऱ्या वेन पार्नेलला सामनावीराचा बहुमान मिळाला.
राजस्थानवरील मोठ्या विजयासह आरसीबीने प्लेऑफमधील आशा कायम ठेवल्या आहेत. तर राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. या पराभवानंतर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर घसरला. सहा विजय आणि सात पराभवानंतर 13 सामन्यांत त्यांचे 12 गुण आहेत. राजस्थानचा नेट रनरेट 0.140 आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना 19 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय आवश्यक आहे. यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
राजस्थानच्या फलंदाजांचे सपशेल लोटांगण
विजयासाठीच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात राजस्थानचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वालला शून्यावर बाद केले. यानंतर पार्नेलच्या गोलंदाजीवर जोस बटलरही शून्यावर झेलबाद झाला. लागोपाठच्या दोन धक्क्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि पार्नेलच्याच गोलंदाजीवर तो 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटलाही पार्नेलने 10 धावांवर बाद केले. शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 19 चेंडूत 35 धावा फटकावल्या. पण तो मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर जुरेल, अश्विन, झाम्पा, संदीप शर्मा आणि आसिफही स्वस्तात माघारी परतले आणि राजस्थानचा संपूर्ण संघ 10.3 षटकांत 59 धावांवर गारद झाला. विशेष म्हणजे, राजस्थानच्या केवळ दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. वेन पार्नेलने शानदार गोलंदाजी करताना 10 धावांत 3 बळी घेतले. तर ब्रेसवेल आणि कर्ण शर्माला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.
डु प्लेसिस, मॅक्सवेलची अर्धशतके
प्रारंभी, नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार डु प्लेसिसने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट आणि डु प्लेसिस यांनी संयमी फलंदाजी करीत सात षटकात 50 धावांची सलामी दिली. केएम आसिफने विराटला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. विराटने 19 चेंडूत 18 धावांची खेळी केली. डु प्लेसिसने मॅक्सवेलच्या साथीने आरसीबीचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 69 धावांची भागिदारी केली. डु प्लेसिसने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीत फॅफने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. डु प्लेसिस बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव ढेपाळला. 119 धावांवर दुसरी विकेट पडल्यानंतर लागोपाठ तीन विकेट पडल्या. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलने मात्र धावांचा पाऊस पाडला. त्याने 33 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 54 धावा केल्या.
फॅफ आणि मॅक्सवेलचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अनुभवी दिनेश कार्तिक पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. कार्तिकला शून्यावर झाम्पाने तंबूत पाठवले. अखेरीस अनुज रावत याने वादळी फलंदाजी करत आरसीबीचा डाव 171 धावांपर्यंत पोहचवला. मायकेल ब्रेसवेल 9 धावांवर नाबाद राहिला. तर अनुज रावतने 11 चेंडूत नाबाद 29 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 5 बाद 171 (विराट कोहली 18, डु प्लेसिस 44 चेंडूत 55, ग्लेन मॅक्सवेल 33 चेंडूत 54, ब्रेसवेल नाबाद 9, अनुज रावत 11 चेंडूत नाबाद 29, अॅडम झाम्पा 25 धावांत 2 बळी, के.आसीफ 42 धावांत 2 बळी, संदीप शर्मा एक बळी).
राजस्थान रॉयल्स 10.3 षटकांत सर्वबाद 59 (संजू सॅमसन 4, जो रुट 10, हेटमायर 19 चेंडूत 35, वेन पार्नेल 10 धावांत 3 बळी, ब्रेसवेल व कर्ण शर्मा प्रत्येकी 2 बळी, मोहम्मद सिराज, मॅक्सवेल प्रत्येकी एक बळी).
अर्धशतक एक विक्रम अनेक!
इंडियन प्रीमियर लीगमध्ये फॅफ डू प्लेसिस जबरदस्त फॉर्ममध्ये असून रविवारी राजस्थानविरुद्ध सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी साकारली. या कामगिरीसह त्याने हंगामातील आपल्या 600 आणि आयपीएलमधील 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएल इतिहासामध्ये डु प्लेसिस 15 वा खेळाडू आहे, ज्याने या लीगमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. याशिवाय, त्याने सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत 24 धावांचा टप्पा पार करताच त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 600 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. या धावा करण्यापूर्वी त्याने 11 सामने खेळताना 576 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 अर्धशतकांचाही समावेश होता.
आयपीएलमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 4000 धावा करणारे खेळाडू
डाव फलंदाज
105 केएल राहुल
112 ख्रिस गेल
114 डेविड वॉर्नर
121 डू प्लेसिस
128 विराट कोहली
131 एबी डिविलियर्स