इ प्लूटो 7 जी प्रो सादर : लाखाच्या आत किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इ प्लूटो 7 जी प्रो’ ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर नुकतीच बाजारात दाखल झाली असून 1 लाख रुपयाच्या आत तिची किंमत असणार आहे. सदरची दुचाकी ही प्युअर इव्ही कंपनीने सादर केली असून गाडीच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. येत्या महिन्यात अखेरीस स्कूटरचे वितरण केले जाणार असल्याची माहिती आहे.
इ प्लुटो 7 जी प्रोची किंमत 94 हजार रुपयेपेक्षा जास्त (एक्सशोरुम) असणार असून मॅटी ब्लॅक, ग्रे व व्हाईट या रंगात सादर करण्यात आली आहे. राज्यांतर्गत विक्रीवेळी सदरच्या गाडीची किंमत बदलणार असल्याचे (सवलतीनुसार) कंपनीने स्पष्ट केले आहे.
विक्री वाढवण्यावर भर
सर्व विक्रेत्यांमार्फत बुकिंग खुले करण्यात आले असून आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 300 टच पॉइंटस्ची उभारणी करण्यात येणार असल्याची
माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. यायोगे विविध राज्यात स्कूटरच्या विक्रीवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. याला 3.0 केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती मोटरसायकलमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची असेल. 100 ते 150 किमीचे अंतर एकदा चार्जनंतर स्कूटर पार करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.