दक्षिणेकडील महत्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसने अधिकृतपणे सिद्धरामय्या यांचे नाव घोषित करून अनेक दिवसांची प्रतिक्षा संपवली. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन अनेक महत्वाची खाती त्यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांचा शपथविधी सोहळा 20 मे रोजी बेंगळूर येथे होणार आहे. या संबंधीची माहीती काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत असलेले त्यांचे छायाचित्र ट्विट केले आहे. “काँग्रेसची टीम कर्नाटकातील लोकांच्या प्रगती, कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध आहे. आम्ही 6.5 कोटी कन्नडिगांना दिलेल्या 5 हमींची अंमलबजावणी करू.” असे ट्विटरवर लिहिले आहे.
कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर, या दोघांनीही राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी एकजुटीने काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. “कन्नडीगांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू. लोकाभिमुख, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि कॉंग्रेसच्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून काम करेल.” असे सिद्धरामय्या यांनी एका फोटोसह ट्विट केला आहे.