सुबोधकुमार जायस्वाल यांच्याकडून स्विकारला पदभार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांनी गुऊवारी नवीन सीबीआय संचालक (प्रमुख) म्हणून पदभार स्वीकारला असून ते पुढील दोन वर्षांसाठी या पदावर राहतील. सीबीआयचे मावळते संचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सीबीआय मुख्यालयात प्रवीण सूद यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सूद हे कर्नाटक केडरचे 1986-बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सीबीआय प्रमुखपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक (डीजीपी) होते. 13 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सीबीआय संचालक पदासाठी प्रवीण सूद यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने 14 मे रोजी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. सूद यांच्याशिवाय मध्यप्रदेशचे डीजीपी सुधीर सक्सेना आणि वरिष्ठ आयपीएस ताज हसन यांची नावे सीबीआय प्रमुखपदाच्या शर्यतीत होती. यामध्ये प्रवीण सूद यांच्या नावावर चर्चेअंती शिक्कामोर्तब करण्यात आले होते. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रवीण सूद हे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील ओमप्रकाश सूद दिल्ली सरकारमध्ये लिपिक होते, तर आई कमलेश सूद दिल्लीतील सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. सूद यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले. 1986 मध्ये वयाच्या 22 व्या वषी ते आयपीएस झाले. त्यांना कर्नाटक केडर मिळाले. सेवेत असताना त्यांनी आयआयएम बेंगळूर येथून पब्लिक पोलीस मॅनेजमेंटमध्ये एमबीए पूर्ण केले.
पोलीस सेवेत यशस्वी कारकीर्द
पोलीस सेवेच्या सुऊवातीच्या टप्प्यात ते बळ्ळारी आणि रायचूरमध्ये पोलीस अधीक्षक होते. याशिवाय बेंगळूर आणि म्हैसूरमध्येही डीसीपी पदावर त्यांनी सेवा बजावलेली आहे. सूद यांना 1996 मध्ये मुख्यमंत्री सुवर्णपदक मिळाले आहे. याशिवाय 2002 मध्ये पोलीस पदक आणि 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदक राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जून 2020 मध्ये प्रवीण सूद यांना कर्नाटकचे डीजीपी बनवण्यात आले. आता ते पुढील दोन वर्षे सीबीआय संचालक पदावर कार्यरत राहतील.
कौटुंबिक पार्श्वभूमी
प्रवीण सूद यांच्या पत्नी विनिता सूद या सामाजिक उद्योजिका आहेत. त्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी आशिता सूद कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आशिता क्रिकेटर मयंक अग्रवालसोबत विवाहबद्ध झाली आहे. मयंक अग्रवाल हा बेंगळूरचा रहिवासी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कर्नाटककडून खेळतो. सध्याच्या आयपीएल हंगामात तो सनरायझर्स हैदराबाद संघासोबत खेळत आहे.
डी. के. शिवकुमार-सूद यांच्यात मतभेद
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीपूर्वी 14 मार्च रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी प्रवीण सूद यांना नालायक असे संबोधले होते. कर्नाटकचे डीजीपी सीबीआय प्रमुख पदासाठी योग्य नाहीत. ते गेली तीन वर्षे डीजीपी पदावर कार्यरत असून भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला होता. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, असेही त्यांनी म्हटले होते. सूद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर 25 गुन्हे दाखल केले आहेत, परंतु भाजप नेत्यांवर एकही गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप करत शिवकुमार यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यास सूद यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही शिवकुमार म्हणाले होते.