‘बेगम, बादशाह,गुलाम आणि…गेम!’
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मना मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. सगळ्यांच्या सोयीचं ठरलेले हे माध्यम आता मराठी कलाकारांसाठी सुद्धा उत्तम संधी ठरत आहे. अशाच काही जबरदस्त मराठी कलाकृतींसाठी एक स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ उपलब्ध आहे. प्लॅनेट मराठीवर मराठी चित्रपट अन् वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या प्लॅटफॉर्मवर आता एका नवीन वेबसीरिजची घोषणा करण्यात आली आहे. ‘गेमाडपंथी’ असे या आगामी सीरिजचे नाव आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून याची कहाणी डार्क कॉमेडी स्वरुपाची आहे. एका अपहरणावर आधारित याची कहाणी असल्याचे टीझरमध्ये दिसून येते. या सीरिजमध्ये अभिनेत्री पूजा कातुर्डे आणि प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, दिगंबर नाईक, सविता मालपेकर हे कलाकार दिसून येतील. या सीरिजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.