जन्मापासून दिली दुर्धर आजाराशी झुंज
बेळगाव / प्रतिनिधी
शहापूर (लक्ष्मी रोड) येथील त्या चिमुकल्याचा अखेर दुर्धर आजाराने मृत्यू झाला. सर्वम मंगेश बाळेकुंद्री (वय 3 वर्षे) असे त्याचे नाव आहे. सर्वम जन्मापासून या आजाराशी झुंज देत होता. स्पायनल मस्कुलार अट्रॉफी (Spinal muscular atrophy एसएमए-1) या आजारावरील उपचारासाठी कोट्यावधी रुपयांची गरज होती. उपचाराच्या खर्चासाठी बेळगाववासीय जनतेने आर्थिक मदतीतून हातभार लावला. मात्र या दुर्धर आजारात सर्वमचा गुरुवारी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शहापूर येथील चिमुकल्याला स्पायनल मस्कुलार अट्रॉफी (Spinal muscular atrophy एसएमए-1) नावाचा दुर्मीळ आजार झाला होता. त्याच्यावर बेंगळूर येथील बॅपटीस हॉस्पिटलसह अनेक ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून उपचार सुरू होते. मात्र, या आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी सर्वम मंगेश बाळेकुंद्री (वय 3) या बाळाला सुमारे 16 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज होती. एका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये होती. हे इंजेक्शन फक्त युएसमध्ये मिळते. इम्पोर्ट ड्युटीसह त्या इंजेक्शनची किंमत तब्बल 20 कोटी रुपयापेक्षाही जास्त झाली होती.
सर्वमला जन्मापासूनच या आजाराने घेरले होते. सुरुवातीचे सहा महिने त्याला कोणताही त्रास झाला नाही. मात्र, त्यानंतर त्रास होऊ लागला. त्यावेळी हात-पाय न हलविणे तसेच मानेची समस्या येऊ लागली. यासाठी बेळगाव शहरातील बहुतांशी बालरोग तज्ञांकडे त्यांनी उपचार घेतले. त्यावेळी एमआरआय स्कॅनिंगमधूनही त्याच्या आजाराचे निदान झाले नाही. रक्ताचे नमुने हैद्राबादला पाठवून दिल्यानंतर या दुर्मीळ आजाराची माहिती कुटुंबीयांना मिळाली. जोगेन्स्मा नावाचे 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. सर्वमच्या वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्याने इतक्या मोठ्या रकमेचे इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून देणे न परवडणारे होते. या दुर्धर आजारावर उपचार म्हणून जोलगेन्स्मा Zolgensma नावाच्या इंजेक्शनची गरज होती. हे जगातील सर्वात महाग इंजेक्शन असून त्याची यूएसमध्ये निर्मिती होते. त्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. ज्यावेळी या आजाराचे निदान झाले, त्यावेळी सर्वमचे वय 1 वर्ष 4 महिने होते. 2 वर्षाच्या आत त्याला जोलगेन्स्मा नावाचे इंजेक्शन देणे गरजेचे होते. बेळगावकरांनी त्याला लाखो रुपयांची मदत केली होती. पण उपचारादरम्यान 25 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.