अनेक विदेशी कंपन्यांची नकारात्मक स्थिती : टायगर ग्लोबल, सेक्वॉइया, सॉफ्टबँक, एक्सेल आदी कंपन्यांचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील स्टार्टअप कंपन्यांच्या बाबतीत निधी उभारणीत 2023 मध्ये 72 टक्के इतकी घट नोंदली गेली असल्याची माहिती आहे. व्याजदर वाढ तसेच जागतिक आर्थिक दोलायमान परिस्थितीमुळे गुंतवणूकीत घट झाल्याचे कारण सांगितले जात आहे. टायगर ग्लोबल, सेक्वॉइया, सॉफ्टबँक, एक्सेल आणि वाय कॉम्बिनेटर यांसारख्या विदेशी कंपन्यांनी गुंतवणुकीत रस दाखवला नसल्याचे समोर आले आहे.
टायगर आणि एक्सेलने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2023 मध्ये आतापर्यंत त्यांच्या गुंतवणुकीत 97 टक्क्यांपर्यंत घट नोंदवली आहे. यासोबत, सेक्वॉइया 95 टक्के, वाय कॉम्बिनेटर 87 टक्के आणि सॉफ्टबँक 80 टक्के इतकी घट यांनीही नोंदवलीय.
2022 मध्ये भारतीय स्टार्टअप्सनी उभारलेल्या 26.8 डॉलर अब्जपैकी 26 अब्ज डॉलर विदेशी गुंतवणुकीतून आले. तथापि, देशातील स्टार्टअप कंपन्यांमधील परकीय गुंतवणूक गेल्या वर्षी याच कालावधीत 16.2 अब्ज डॉलर इतकी झाली होती. पण त्यातुलनेत यावर्षी 72 टक्क्यांच्या घसरणीसह 4.58 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली आहे. व्यवहारांची संख्या 852 वरून 241 पर्यंत घसरली असल्याची नोंदही करण्यात आली आहे.
टायगरला भारताचे युनिकॉर्न मशीन म्हटले जाते, ज्याने फ्लिपकार्ट, ओला, झोमॅटो आणि इतर 37 स्टार्टअप्सचे समर्थन केले जे नंतर युनिकॉर्न बनले. एक्सेल हा फ्लिपकार्ट आणि फ्रेशवर्क्सचा प्रारंभिक समर्थक होता. जपानच्या सॉफ्टबँकने ओयो, डिलिव्हरी, पेटीएम, मेस्सो, बीलिंकीट, लेनस्कार्ट आणि इतर अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.