मृत्यूनंतर रक्कम फेडण्याची मुभा
ग्राहकाला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या विविध प्रकारच्या ऑफर्स देत असतात. कधी बाय नाऊ पे लेटर अशी ऑफर, तर कधी अनेक गिफ्टस, 20 टक्के डिस्काउंट, एकावर एक फ्रीम अशा ऑफर्स दिल्या जातात. परंतु एका पिझ्झा कंपनीने सादर केलेली ऑफर ऐकून तुम्ही चक्रावून जाल.
न्यूझीलंडच्या कंपनीने आयुष्यभर पिझ्झा खा आणि मृत्यूनंतर पैसे फेडा अशी ऑफर दिली आहे. वेलिंग्टनच्या पिझ्झेरिया हेल पिझ्झा कंपनीने मार्केटिंगची ही अनोखी पद्धत अवलंबिली आहे. याच्या अंतर्गत ग्राहक कधीही पिझ्झा खाऊ शकतात आणि स्वत:कडे पैसे नसले तरीही त्यांना हा पिझ्झा खाता येणार आहे. याचे पैसे त्यांना आफ्टर लाइफ म्हणजेच मृत्यूनंतर द्यावे लागणार आहेत. हा प्रकार अजब वाटत असला तरीही कंपनीने अशी ऑफर दिली आहे.
रितसर करार होणार
कंपनीच्या वेबसाइटनुसार केवळ न्यूझीलंडच्या नागरिकांसाठी ही ऑफर दिली आहे. येथील 666 लोकांची कंपनीने निवड केली असून ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. याकरता रितसर कायदेशीर करार केला जाणार आहे. कंपनी अन् संबंधित व्यक्तीची यावर स्वाक्षरी असेल. ग्राहक याचे पैसे देण्याची व्यवस्था करेल असे यात नमूद आहे. विशेष म्हणजे यात कुठलाच दंड नसणर आहे. ही ऑफर आता चर्चेचा विषय ठरली आहे. न्यूझीलंडच्या कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने या ऑफरमुळे ग्राहकाला पिझ्झाचे व्यसन लागू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.
मृत्युपत्रात असणार नोंद
करारानुसार ऑफर स्वीकारणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या मृत्यूपत्रात बदल करत पिझ्झाची रक्कम जोडावी लागणार आहे. कंपनीचे सीईओ बेन कमिंग यांच्यानुसार ही ऑफर लोकांना बाय नाऊ पे लेटरच्या जाळ्यापासून वाचविण्यासाठी आहे. आम्ही सध्या काही लोकांनाच ही ऑफर दिली आहे. ही ऑफर यशस्वी ठरल्यास आणखी अनेक लोकांना संधी देण्याची आम्ही तयारी करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.