मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना आज 1 जून रोजी आदरांजली वाहिली जाणार आहे. हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळे मागील 66 वर्षांपासून धगधगता सीमाप्रश्न आजही त्याच ताकदीने लढला जात आहे. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केले आहे. सकाळी 8.30 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे तालुका म. ए. समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
महिला आघाडीचे आवाहन
कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सीमावासियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले. हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानामुळेच आजही बेळगावमध्ये मराठीचे वर्चस्व असून सीमालढा ताकदीने लढला जात आहे. सीमालढ्याला बळ देण्यासाठी मराठी भाषिकांनी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील यांनी केले आहे.
युवा समितीचे आवाहन
1 जून 1986 च्या कन्नड सक्तीविरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली कार्यक्रम होईल. यावेळी युवा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, तालुका प्रमुख मनोहर हुंदरे यांनी केले आहे. कन्नड सक्तीविरोधातील आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली वाहिली जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.