वाहनधारकांना अडचण-नाहक त्रास : धामणे ग्रामपंचायतीने सदर ढिगारा त्वरित हटविण्याची मागणी
वार्ताहर /धामणे
वडगाव-धामणे मेनरोडवर मातीचा ढिगारा मारल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. धामणे गावापासून दोन किलो मीटर अंतरावर एका शेतकऱ्याने आपल्या शेताशेजारी असलेल्या वडगाव-धामणे रस्त्यावर मातीचा ढिगारा मारल्याने रहदारीला मोठी अडचण निर्माण झाल्याने वाहनधारकांना या ढिगाऱ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धामणे गावापासून शहराला जोडणारा हा मोठा रस्ता आहे. त्यामुळे याच रस्त्याने देवगणहट्टी, धामणे ते सीबीटी बेळगाव असे बसच्या दिवसातून 16 वेळा फेऱ्या असतात. त्याप्रमाणे वाहनांची वर्दळ याच रस्त्याने असते. हा मातीचा ढिगारा येथे टाकल्यापासून रात्रीच्या वेळी येत असलेले दुचाकी वाहनधारक गेल्या आठवडाभरात 5 ते 6 जण या ढिगाऱ्याच्या अडचणीमुळे पडून जखमी झाले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनधारकांना लागून राहिला आहे. निदान धामणे ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्याला तो मातीचा ढिगारा रस्त्यावरून हटविण्यास भाग पाडून वाहनधारकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.