विविध देखाव्यांचे सादरीकरण-शिवरायांच्या जयघोषाने शिवप्रेमींत उत्साह
वार्ताहर /किणये
मारुती गल्ली, खादरवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाडे मिरवणूक सोमवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आले होते. गाडे मिरवणुकीची तरुणांनी उत्साहात तयारी केली होती. सोमवारी सायंकाळी बाल युवक मंडळाचे अध्यक्ष अनिल कोळेकर, उपाध्यक्ष अमोल डोळेकर यांच्याहस्ते गाडे मिरवणुकीचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाडे मिरवणूक काढण्यासाठी, कलाकारांना सजविण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित तसेच सध्या सीमाभागातील मराठी माणसांवर कशा पद्धतीने अन्याय-अत्याचार होऊ लागला आहे, याबद्दलचे देखावे सादर करण्यात आले. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. यामुळे खादरवाडी गाव दणाणून गेला होता. या मिरवणुकीत गल्लीतील व गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.